Israel vs Lebanon, Hezbollah Iron Dome: इस्रायलकडून लेबनीज सीमेवर सातत्याने गोळीबार केला जात आहे. तोफगोळ्यांचा मारा सुरू आहे. इस्रायल मागे हटायला तयार नाही. अशातच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठा दावा केला आहे. लेबनीज सीमेवर मोठ्या हल्ल्याची तयारी पूर्ण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या भागात इस्रायली सैनिक आणि हिजबुल्लाहच्या सैनिकांमध्ये युद्ध सुरू आहे. त्याचवेळी हिजबुल्लाहने असा दावा केला आहे की, रामोत नफ्ताली येथील इस्रायलच्या आयर्न डोमला लक्ष्य करून ते पाडण्यात हिज्बुल्लाहला यश आले आहे.
नेतन्याहू यांनी लेबनॉनच्या सीमावर्ती भागाला भेट दिली. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, "आम्ही उत्तरेत भीषण कारवाईसाठी तयार आहोत. कोणत्याही प्रकारे उत्तरेकडील सुरक्षा ढासळू दिली जाणार नाही." इस्रायलकडून असे सांगण्यात आल्यानंतर हिजबुल्लाहने प्रत्युत्तर देत सांगितले, "आम्ही दिवसभरात इस्त्रायली तळांवर अनेक हल्ले केले होते, ज्यात आयर्न डोमवर मिसाइल हल्ल्याचाही समावेश होता. त्यांनी ते उद्ध्वस्त केले आहे."
आयर्न डोम काय करू शकतं?
एक अब्ज डॉलर्सच्या आयर्न डोमच्या अपयशाला तज्ज्ञ 'निराशाजनक' म्हणत आहेत . इस्रायलची भक्कम संरक्षण यंत्रणा अपयशी ठरणे हा लष्करापुढे मोठा प्रश्न आहे. आयर्न डोमबद्दल असे म्हटले जाते की ते कोणतेही हल्ले नष्ट करण्यासाठी 90 टक्के प्रभावी आहे. मात्र शनिवारी ते पॅलेस्टाईनमधून येणाऱ्या हजारो रॉकेटचा सामना करू शकले नाही. शनिवारी झालेल्या हल्ल्यात गाझा पट्टीच्या आत आयर्न डोम यंत्रणा किती प्रभावी होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इस्रायलची आयर्न डोम सिस्टीम कमी पल्ल्याच्या हवाई धोक्यांना तटस्थ करण्यासाठी प्रभावी आहे. तसेच ही यंत्रणा हवेतील कोणतेही क्षेपणास्त्र पूर्णपणे थांबवू शकते. पण हमासने त्याची कमकुवत बाजू ओळखली.
इस्रायल आणि हमास यांच्यात जवळपास आठ महिन्यांपासून भयंकर युद्ध सुरू आहे. यात अनेक निष्पाप जीव गेले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझामध्ये हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. त्याचवेळी हमासच्या सैनिकांनी इस्रायलींना ओलीस ठेवले आहे. त्यात काहींना सोडण्यात आले आहे. परंतु आता इस्रायलने लेबनॉन भागात आणखी गंभीर हल्ल्याची तयारी केली आहे.
दरम्यान, गेल्या काही आठवड्यांमध्ये इस्रायलने लेबनॉनमध्ये कार आणि मोटारसायकलवर स्वार असलेले हिजबुल्लाहह सैनिक, पॅलेस्टिनी सहयोगी आणि लेबनीज अतिरेकी यांना लक्ष्य केले. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून झालेल्या हिंसाचारात लेबनॉनमध्ये किमान ४५५ लोक मारले गेले आहेत. बहुतेक लोक लढाऊ आहेत. परंतु ८८ नागरिक देखील मारले गेले आहेत.