स्थलांतर आपल्या इच्छेनं आणि तयारीनिशी केलेलं असेल तर ठीक, पण तशी अजिबात इच्छा नसताना, तडकाफडकी नुसतं घरच नाही तर देशच सोडून दुसऱ्या देशात जगण्यासाठी जावं लागलं तर काय होईल?
- युक्रेनचे लाखो नागरिक सध्या हाच अनुभव घेत आहेत. अनास्टाशिया आणि ओलेक्सी हे युक्रेनमधलं जोडपं. त्यांनी सध्या इंग्लडमध्ये आसरा घेतला आहे. युक्रेनमध्ये अनास्टाशिया वकिली करायची तर ओलेक्सी हा औषध विक्रेता होता. आपापला व्यवसाय सांभाळून पैसा उभा करण्यासाठी त्यांनी ड्रायक्लिन फर्निचर हा जोडधंदाही उभा केला होता. पण रशियानं युक्रेनवर आक्रमण करून बाॅम्बहल्ले सुरू केल्यावर या युद्धभूमीत आपलं जगणं मुश्किल आहे, हे दोघांनी ओळखलं. या दोघांचे मित्र-मैत्रिणी इंग्लडमध्ये गेले होते. त्यांच्या मदतीने हे दोघे इंग्लडमधील साउथपोर्ट या शहरात राहायला गेले. आपल्यावर अचानक येऊन बाॅम्ब पडणार नाही, याची खात्री पटायला दोघांनाही सहा महिने लागले. ॲनास्टाशियाने इंग्लडमध्ये वकिली करण्याची संधी शोधली पण युक्रेन आणि इंग्लंडमधील कायदेव्यवस्था वेगळी असल्याने तिला वकिली करता आली नाही. तिने आणि नवऱ्याने ड्रायक्लिन फर्निचरचा व्यवसाय करण्याचं ठरवलं. हळूहळू त्यांना क्लायंट मिळू लागले आहेत. दोघांची नव्या जागेत जगण्याची उमेद वाढली आहे.
युलियानं युद्ध सुरू झाल्यानंतर तिसऱ्या महिन्यात युक्रेन सोडलं. तिला नाॅटिंगहॅममधून मदत मिळण्याचं आश्वासन मिळालं आणि तिने आपल्या दोन मुली आणि लाडक्या श्वानाला घेऊन युक्रेन सोडलं. युलियाचा नवरा अजूनही युक्रेनमधेच आहे. युलियाचा युक्रेनमध्ये वेडिंग ड्रेस तयार करण्याचा व्यवसाय जोमात सुरू होता. पण आता नाॅटिंगहॅममध्ये येऊन काय करायचं, असा प्रश्न तिला पडला. तिला मदत करणाऱ्यांनी या नवीन जागेतही तिला तिचा वेडिंग ड्रेस तयार करण्याचा व्यवसाय सुरू करण्यास सुचवलं. पण इंग्लंडमध्ये व्यवसाय करणं सोपं नव्हतंच. तिने खूप प्रयत्न करूनही वेडिंग ड्रेस तयार करण्याचा व्यवसाय चालला नाही, म्हणून युलियानं शिवणाचं कौशल्य वापरून शिवणकाम करण्याचा निर्णय घेतला. आता कुठेतरी तिच्या हातात थोडा फार पैसा येऊ लागला आहे.
रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं तेव्हा पोलिना तिच्या शाळेतील मुलांचा नृत्याचा सराव घेत होती. एका क्षणात तिच्यापुढे ‘आता पुढे काय?’ - असा प्रश्न उभा राहिला. आपलं शहर हल्ल्यात उद्ध्वस्त होणार हे तिने ओळखलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिने युक्रेन सोडून पोलंडकडे जाण्याचा प्रवास सुरू केला. महिन्याभरानंतर पोलिना कॅनडात राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे गेली. नव्या जागेत तिने जगायला सुरुवात तर केली पण आपण युक्रेनचा भाग आहोत आणि आपला देश उद्ध्वस्त होतोय, हे काही केल्या तिच्या मनातून जात नाही. मनातली अस्वस्थता दूर करण्यासाठी पोलिनानं नोकरी धरली पण नृत्य हाच तिचा ध्यास होता. तिने हिंमत करून एका स्टुडिओत भाड्यानं जागा मिळवली आणि तिथे स्वत:चा डान्स क्लास सुरू केला. अनेक कॅॅनेडियन मुलं आणि युक्रेन निर्वासितांची मुलं सध्या तिच्याकडे नृत्य शिकत आहेत.
व्लोदिमिर आणि रिजिना रुसूमास्काय या जोडप्यानं एक वर्षापूर्वी युक्रेन सोडलं. या आधीही बळजबरीनं आपलं घर सोडण्याचा त्यांना अनुभव होताच. ते आधी युक्रेनमध्ये डोनेस्क या प्रांतात राहत होते. पण २०१४ मध्ये रशियन फुटीरवाद्यांनी त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त केला. तिथून किव्हमध्ये राहायला आले. तिथे त्यांनी नर्सरी सुरू केली. पण रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर त्यांना देशच सोडावा लागला. ते पश्चिम ऑस्ट्रेलियात पर्थ येथे आपल्या मित्रांच्या मदतीने राहत आहेत. या नवीन देशात व्लोदिमिर दिवसभर राबूनही मायदेशातल्या व्यवसायात जेवढं कमवायचा त्याच्या १० टक्केही पैसे त्याला मिळत नाहीत. आपलं घर, आपला व्यवसाय, आपला देश सोडावा लागल्यानं भीती आणि वेदनेनं व्लोदिमिर आणि रिजिनाच्या मनात कायमस्वरूपी घर केलं आहे. - युक्रेनमधील लाखो निर्वासितांची गोष्ट या चार गोष्टींपेक्षा अशी कितीशी वेगळी असेल?
युद्ध सुरू होताच पांगापांगजगायचं असेल तर देश सोडण्याशिवाय पर्याय नाही म्हणून रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनमधील लाखो नागरिकांनी देश सोडण्याचा पर्याय स्वीकारला. लाखो निर्वासित तर रशियाच्याच आश्रयाला गेले. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पोलंड या देशांसोबत इटली, स्पेन, फ्रान्स, स्लोव्हाकिया, रोमानिया, तुर्की, ऑस्ट्रिया या देशांमध्ये युक्रेनचे नागरिक निर्वासित म्हणून जगत आहेत.