डब्लिन : गेल्या फेब्रुवारीत झालेल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षास स्पष्ट बहुमत न मिळाल्याने शनिवारी आयर्लंडमध्ये तीन पक्षांचे आघाडी सरकार स्थापन झाले. त्यासाठी ठरलेल्या सत्ता वाटपाच्या सूत्रानुसार आता मायकेल मार्टिन हे पंतप्रधान, तर मावळते पंतप्रधान लिओ अशोक वराडकर उपपंतप्रधान झाले.
अडीच वर्षांनी डिसेंबर २०२२ मध्ये मूळचे भारतीय वंशाचे असलेले ४१ वर्षांचे वराडकर पुन्हा आयर्लंडचे पंतप्रधान होतील. फिने गेल या पक्षाचे नेते असलेले वराडकर सन २०१७ पासून ते फेब्रुवारीतील निवडणुकीपर्यंत पंतप्रधान होते. निकालानंतर कोरोना महामारीमुळे सरकार स्थापनेचे त्रांगडे लगेच सुटू न शकल्याने वराडकर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कायम होते. वराडकर यांचा जन्म आयर्लंडमध्येच झाला असला तरी त्यांचे वडील मूळचे कोकणातील मालवणचे आहेत.
वराडकर यांचा फिने गेल, मार्टिन यांचा फिआन्ना पेल व ग्रीन पार्टी या तीन पक्षांनी मिळून आताचे आघाडी सरकार स्थापन केले आहे. फिने गेल व फिआन्ना गेल हे परस्परांचे कट्टर प्रतिस्पर्धी पक्ष असून, आयर्लंडमधील यादवी युद्धानंतर हे दोन पक्ष सत्तेत प्रथमच एकत्र आलेआहेत.