वेलिंग्टन : घोडा पाळण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे निराश न होता, न्यूझीलंडमधील एका मुलीने गायीलाच घोडा बनविले. तिने या गायीला सात वर्षे शर्यतीतील अश्वांप्रमाणे अडथळ््यांवरून उड्या मारण्याचे प्रशिक्षण दिले. आज ही गाय घोड्यालाही लाजवेल, अशा उड्या मारते. ही कहाणी साउथलँड भागातील डेअरी फॉर्ममध्ये काम करणाऱ्या हन्नाह सिम्पसनची आहे. हन्नाहला घोडा आणि घोडेस्वारी आवडते. अडथळे पार करत धावणाऱ्या घोड्यांचे आकर्षण असल्यामुळे तिने घरच्यांकडे घोडा घेऊन देण्याचा हट्ट धरला. तथापि, पालकांनी घोडा घेणे आवाक्याबाहेर असल्याचे सांगून, तिचा हट्ट पुरविण्यास नकार दिला. त्यामुळे हन्नाह हिरमुसली. मात्र, नाउमेद झाली नाही. तिने आपल्या डेअरी फार्ममधील लिलॅक या गायीलाच घोडा बनवून तिच्यावरून रपेट मारणे सुरू केले. तेव्हा हन्नाह ११ वर्षांची होती. तिने लिलॅकला घोड्याप्रमाणे धावण्याचे, तसेच अडथळ््यांवरून उड्या मारण्याचे सलग सात वर्षे प्रशिक्षण दिले. शहरातील कोणत्याही अश्वाशी स्पर्धा केल्यास लिलॅक कुठेही कमी पडणार नाही, अशा रितीने तिने लिलॅकला तयार केले आहे. मला नेहमीच साहसी गोष्टी आवडतात. मला एक अश्व हवा होता आणि माझ्याकडे एकही नाही, असे सिम्पसनने सांगितले. मी लिलॅकला कोणतेही प्रशिक्षण दिले नाही. फक्त तिच्या पाठीवर बसून रपेट मारायचे. त्यातूनच तिची उड्या मारण्याची क्षमता वाढत गेली. आज लिलॅक उन्मळून पडलेल्या झाडांसह चार फुटांएवढ्या उंचीच्या अडथळ््यांवरून उडी मारते. ती एखाद्या अश्वाहून अधिक विशेष आणि दुर्मीळ आहे, असे सिम्पसनने सांगितले.
गायीला शिकविली घोड्यासारखी उडी
By admin | Published: January 06, 2017 2:15 AM