वॉशिंग्टन : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाला (आयएस) नष्ट करण्याची प्रतिज्ञा करताना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी कॅलिफोर्नियात नुकत्याच झालेल्या हत्याकांडानंतर अस्वस्थ झालेल्या अमेरिकनांना नव्या पद्धतीच्या दहशतवादाच्या भीतीतून बाहेर काढले जाईल, असे आश्वासन दिले. नव्या पद्धतीचा दहशतवाद अमेरिकेसह संपूर्ण जगात लोकांच्या मनात विष कालवत असल्याचे ते म्हणाले.आपल्या व्हाईट हाऊसमधील ओव्हल कार्यालयातून देशाला उद्देशून रविवारी केलेल्या या भाषणात ओबामा म्हणाले की, ‘दहशतवादाचा धोका आहे हे खरेच; परंतु अमेरिका त्यातून बाहेर पडेल. असे असले तरी या दहशतवादाचा पंथ पराभूत करण्यासाठी इराक आणि सिरियामध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य तुकड्या पाठविण्यात येणार नाहीत.’ इसिसला नाहीसे करण्याचे धोरण सांगताना ओबामा यांनी त्याला अमेरिकन लष्कराचे कमांडर्स आणि दहशतवादविरोधी तज्ज्ञांचा पाठिंबा असल्याचे म्हटले. बैरूत : अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीने सिरियाच्या पूर्वेकडील लष्करी छावणीवर केलेल्या बॉम्बहल्ल्यांत सिरियाचे चार सैनिक ठार, तर १३ जण जखमी झाले. आघाडीकडून झालेल्या हल्ल्यात प्रथमच सरकारी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे मानवी हक्क गटाने म्हटले.
इसिसला नष्ट करू -बराक ओबामा
By admin | Published: December 08, 2015 2:06 AM