शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहू !... चेहरा रक्ताने माखलेला आणि तरीही थंब्सअप दाखविणारा युक्रेनी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 10:31 AM2022-12-14T10:31:54+5:302022-12-14T10:32:16+5:30
आपला देश संकटात आहे आणि देशाला आपली गरज आहे म्हटल्यावर करार आणि त्यातल्या अटी-शर्ती वोरोशायलोव्हच्या दृष्टीने गौण ठरल्या आणि त्याने पुन्हा एकदा युक्रेनी सैन्यदलात वैमानिक म्हणून प्रवेश केला.
युक्रेनच्या मेजर वादीम वोरोशायलोव्ह या पायलटला त्याच्या मिग-२९ या विमानातून इमर्जंन्सी इजेक्ट करावं लागलं. पॅराशूट लावून जमिनीकडे येत असताना त्याने स्वतःचा सेल्फी काढला. संपूर्ण चेहरा रक्ताने माखलेला आणि तरीही थंब्सअप दाखविणारा हा सेल्फी त्याने नंतर सोशल मीडियावर पोस्ट केला, त्याला जगभरातून उदंड प्रतिसाद मिळाला आणि त्याच्या धाडसाचं, हिंमतीचं प्रचंड कौतुकही झालं. पण हा वोरोशायलोव्ह आहे तरी कोण?
वोरोशायलोव्ह हा एक युक्रेनी पायलट. २०२१ सालच्या जुलै महिन्यात त्याचा युक्रेनी सरकारशी, त्यांच्या सैन्याशी असलेला करार संपला आणि त्याने तो पुन्हा नूतनीकरण करण्यास नकार दिला. त्याचं म्हणणं होतं, त्याच्या पायलटच्या नोकरीत त्याला फार जास्त वेळ काम करावं लागतं आणि त्या मानाने पगार मात्र फारच कमी मिळतो. इतकंच नाही, तर ज्या ज्या वेळी एखाद्या विमानाचा अपघात होतो त्या त्या वेळी सैन्यदल त्याचा सगळा दोष कायम वैमानिकालाच देतं. ते कधीही हे बघत नाहीत की चूक वैमानिकाची होती की एखादा तांत्रिक बिघाड होता? शिवाय युक्रेनी सैन्यदलातील अनेक विमानं बऱ्यापैकी जुनी असल्यामुळे असे प्रसंग वारंवार उद्भवतात. अशा अनेक कारणांमुळे त्याने सैन्यदलाशी पुन्हा करार करायचा नाही, असा निर्णय घेतला होता. पण करार केला काय किंवा न केला काय, वोरोशायलोव्ह होता तर हाडाचा वैमानिक ! युक्रेनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विमानांच्या आकाशातल्या कसरती बघून त्याच्या काळजात कळ उठतच होती. अशातच एके दिवशी रशियाने युक्रेनवर हल्ला केला.
आपला देश संकटात आहे आणि देशाला आपली गरज आहे म्हटल्यावर करार आणि त्यातल्या अटी-शर्ती वोरोशायलोव्हच्या दृष्टीने गौण ठरल्या आणि त्याने पुन्हा एकदा युक्रेनी सैन्यदलात वैमानिक म्हणून प्रवेश केला. आता युद्ध चांगलंच पेटलं होतं. रशियन सैन्य आत घुसून युक्रेनवर बॉम्बहल्ले करत होतं. रशियन सैन्याच्या हल्ल्यांमध्ये दोन बाबी विशेष नमूद करण्यासारख्या होत्या. एक म्हणजे ते युक्रेनी संसाधनांवर ते हल्ले करत होते. त्यांचं लक्ष्य युक्रेनी शहरं आणि वीजनिर्मिती केंद्रं होती. मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे रशियन्स हे हल्ले ड्रोन वापरून करत होते. इराणमध्ये तयार केलेले शाहेद नावाचे ड्रोन्स रशियन सैन्य वापरत होतं. हे ड्रोन्स आत्मघातकी स्वरूपाचे होते. म्हणजे हे ड्रोन्स यायचे आणि बॉम्बिंग करायचे. त्यात ते ड्रोन नष्ट झालं तरी रशियाला चालणार होतं, पण रशियाची जास्तीत जास्त ड्रोन्स पाडून टाकून नष्ट करणं हाच एक उपाय युक्रेनकडे होता. वोरोशायलोव्ह त्यातच तरबेज होता.
वोरोशायलोव्हने एका आठवड्यात तब्बल पाच ड्रोन्स पाडले आणि नष्ट केले. मात्र यातल्या शेवटच्या ड्रोनने जाता जाता वोरोशायलोव्हच्या मिग २९वर हल्ला केला. वोरोशायलोव्हने उद्ध्वस्त केलेल्या मानवरहित ड्रोनचा जेव्हा स्फोट झाला त्यावेळी त्यातले काही तुकडे त्याच्या मानेत आणि चेहेऱ्यात घुसले. त्यामुळे त्याचा संपूर्ण चेहरा रक्तबंबाळ झाला. वोरोशायलॉव्हला त्यामुळे इमर्जन्सी इजेक्ट करावं लागलं. अशा वेळी वैमानिक आपलं विमान सोडून देतो आणि पॅराशूटच्या मदतीने सुखरूप जमिनीवर पोचतो. हे करण्यासाठी विमानात एक इमर्जंन्सी हँडल दिलेलं असतं. मात्र कुठलाही वैमानिक अगदी आणीबाणीची वेळ येईपर्यंत ही सुविधा वापरत नाही. कारण एकदा वैमानिकाने विमान सोडून दिल्यानंतर ते कुठेही जाऊन पडू शकतं आणि त्यातूनही अपघात होऊ शकतो. शिवाय विमानाची किमतही प्रचंड असते. वोरोशायलोव्हच्या बाबतीतही विमान सोडून देणं हाच एक शेवटचा पर्याय होता. त्यानं विमानातून पॅराशूटनं खाली उडी मारली. मात्र त्यावेळी त्याचा मोबाइल त्याच्या हातातच होता. पॅराशूटने तरंगत खाली येताना त्यानं स्वतःचा रक्तबंबाळ झालेला आणि तरीही थंब्सअप दाखविणारा सेल्फी काढला.
रक्तबंबाळ अवस्थेत पॅराशूटने खाली उतरल्यानंतर वोरोशायलोव्हला इस्पितळात दाखल करावं लागलं. त्याने त्याचा सेल्फी जेव्हा इंस्टाग्रामवर पोस्ट केली तेव्हा त्याने त्या फोटोसोबत एक ओळ लिहिली... “मी सगळ्या जगाला अगदी थोडक्यात आणि स्पष्टपणे एवढंच सांगेन.. आम्हाला कोणीही, कधीही नमवू शकत नाही. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही लढत राहू..
हिरो ऑफ युक्रेन..
वोरोशायलोव्हच्या हिमतीला युक्रेनच्या नागरिकांनीच नव्हे, तर अख्ख्या जगानं सलाम केला आणि युक्रेनी नागरिकांच्या चिवटपणाचं कौतुक केलं. युक्रेनी अध्यक्ष झेलेन्स्की यांनीही वोरोशायलोव्हचा सन्मान केला आणि त्याला “हिरो ऑफ युक्रेन, ऑर्डर ऑफ द गोल्ड स्टार” ही मानाची पदवी दिली.