ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 14 - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे मोदींचा वारू चौखुर उधळला आहे. नरेंद्र मोदींच्या या विजयाचा भारताच्या शेजारील राष्ट्रांनीही म्हणजेच पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीननंही धसका घेतला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर प्रदेशमधील मिळवलेल्या विजयाचं अभिनंदन करण्यासाठी एका पाकिस्तानी मुलीनंही पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात मुलीनं भारत आणि पाकिस्तानमध्ये शांती नांदावी, यासाठी काम करण्याचं आवाहन केलं आहे. या मुलीचं नाव अकीदत नाविद असून, ती फक्त 11 वर्षांची आहे.पत्रात ती म्हणते, प्रिय मोदीजी, एकदा मला माझे वडील म्हणाले होते, की लोकांची मनं जिंकणे हे अद्भुत कार्य आहे. कदाचित तुम्ही भारतीयांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच तुम्ही उत्तर प्रदेशच्या निवडणुकांत विजय मिळाला आहे. मात्र मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्हाला पाकिस्तानी आणि भारतीयांची मनं जिंकायची असतील तर दोन्ही देशांत शांती नांदणं गरजेचं आहे, यासाठी तुम्ही मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे. दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित करण्याची गरज असून, शांतीचा पूल उभारला पाहिजे. तुम्ही ठरवा की एकमेकांकडून काय खरेदी करायचं आणि काय नाही. तुम्ही एकमेकांकडून बुलेट खरेदी करू नका, मात्र पुस्तकं नक्कीच विकत घ्या, दोन्ही देशांनी एकमेकांकडून गन खरेदी करू नका, मात्र औधषं तर खरेदी करू शकता. शेवटी निवड ही आपलीच आहे. शांती की वाद यात काय निवडायचं हे तुम्हीच ठरवणार आहात. तुम्हाला तुमच्या विजयासाठी पुन्हा एकदा अभिनंदन. त्याप्रमाणेच अकीदतचा भाऊ मोरिख यानंही पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बावजा यांना पत्र लिहून दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईचं अभिनंदन केलं आहे. अकिदत ही लाहोरमधल्या कॅथेड्रल शाळेत पाचव्या इयत्तेत शिकते. तर तिचा भाऊ 8व्या इयत्तेत शिकत आहे. अकीदत हिला 2016मध्ये नोबेल विजेते कोलंबियाचे राष्ट्रपती जुआन मॅनुअल सँटोस यांच्याकडून ग्रीटिंगही देण्यात आलं होतं.
पाकच्या चिमुकलीचं मोदींना पत्र, दोन्ही देशांत हवी शांतता
By admin | Published: March 14, 2017 9:37 PM