ऑनलाइन लोकमत
तावा (कॅनडा), दि. २० - सत्ताधारी कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचा मोठ्या फरकाने पराभव करणा-या कॅनडाच्या नव्या पंतप्रधानांचे जस्टिन ट्रुडींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केले आहे. सोमवारी कॅनडामध्ये सत्तापालट झाला असून कॅनडाच्या संसदेच्या ३३८ जागांपैकी सुमारे १७४ जागा जस्टिन यांच्या लिबरल पार्टीने जिंकल्याचे वृत्त आहे.
जस्टिन यांचे वडील पंतप्रधान असताना तब्बल १२ वर्षे ज्या घरामध्ये जस्टिन लहानाचे मोठे झाले त्याच पंतप्रधानांच्या निवासामध्ये ते पुन्हा रहायला जातील असा योगायोग जमून आला आहे.
कन्झर्वेटिव्ह पक्ष ऐन भरात असताना वाताहत झालेल्या लिबरल पार्टीची धुरा २०१३ मध्ये जस्टिन ट्रुडींनी आपल्या खांद्यावर घेतली आणि सगळ्या विरोधकांना चीत करत मतांच्या टक्केवारीत व जागांमध्ये ऐतिहासिक वाढ साधली. ट्रुडी अद्याप खूप लहान आहेत आणि पंतप्रधानपदाची जबाबदारी ते पेलू शकणार नाहीत, या विरोधकांच्या टीकेला मतदारांनी केराची टोपली दाखवली.
उमदा स्वभाव आणि आर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी खर्च वाढवण्याचे धोरण तसेच वित्तीय तुटीपेक्षा अर्थव्यवस्थेच्या वाढीला महत्त्व देण्याची घोषणा मतदारांना भावली असल्याचे जस्टिन यांच्या पाठिराख्यांचे म्हणणे आहे.
प्रचारसभांमध्ये जस्टिन यांना ऐकण्यासाठी तुफान गर्दी होत होती आणि हवाबदलाचे संकेत मिळत होते. केनेडी अथवा ओबामा यांची आठवण व्हावी अशी भव्य प्रचारमोहीम जस्टिन यांनी यावेळी राबवली होती, जिचे चीज झाले आहे.