वॉशिंग्टन : लिबियात अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात तेथील ‘इसिस’चा म्होरक्या ठार झाल्याचे पेंटॅगॉनने जाहीर केले आहे. ‘इसिस’चा क्रूरकर्मा जिहादी जॉन मारला गेल्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडली आहे.अबू नाबील ऊर्फ विसाम नज्म अब्द जायद अल जुबायदी, असे ठार झालेल्याचे नाव आहे. पेंटॅगॉनचे प्रेस सचिव पीटर कुक यांनी ही घोषणा करताना सांगितले की, गेल्या शुक्रवारी अमेरिकी लष्कराने लिबियात केलेल्या हवाई हल्ल्यात तो मारला गेला.अबू नाबील याचा प्रदीर्घ काळ अल-कायदाशी संबंध होता आणि नंतर तो ‘इसिस’चा लिबियात म्होरक्या बनला होता. त्याच्या एफ-१५ या लढाऊ विमानांनी हल्ला केला, असे अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले.गेल्या शुक्रवारी पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ल्यात १२९ जण ठार झाले होते. त्याची जबाबदारी ‘इसिस’ने स्वीकारली होती. त्यानंतर लगेचच अमेरिकेतर्फे ही घोषणा करण्यात आली. मात्र, या दोन घटनांचा परस्परांशी संबंध नसल्याचे अमेरिकेतर्फे सांगण्यात आले आहे.पीटर कुक म्हणाले की, फेब्रुवारी २०१५ मध्ये एका ख्रिस्ती नागरिकाची हत्या करण्यात आली होती. त्याची चित्रफीत दाखविताना नाबील हाच प्रवक्ता होता, असा आम्हाला संशय आहे. तो ठार झाल्याने लिबियात ‘इसिस’ची क्षमता बऱ्याच प्रमाणात घटेल. लिबियात तळ स्थापन करणे, नवीन भरती आणि अमेरिकेवर हल्ले करण्याचा ‘इसिस’चा कट होता. लिबियात ‘इसिस’च्या एखाद्या नेत्याविरुद्ध हा पहिलाच अमेरिकी हल्ला आहे. ‘इसिस’ जेथून जेथून कारवाया करते, तेथे तेथे आम्ही हल्ले करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. कुक म्हणाले की, पॅरिसवरील हल्ल्याच्या अगोदर ही मोहीम सुरू करण्यात आली होती.जिहादी जॉन हा त्याच्या साथीदारासह मारला गेल्याचे स्पष्ट झाले असून, गेल्या सहा आठवड्यांपासून त्याच्यावर नजर ठेवण्यात आली होती, असे अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले.
अमेरिकी हवाई हल्ल्यात लिबियन ‘इसिस’ नेता ठार
By admin | Published: November 16, 2015 12:13 AM