ऑनलाइन लोकमत
बार्सिलोना, दि. ६ - अलीकडेच तडकाफडकी निवृत्ती जाहीर करणारा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी नव्या अडचणीत सापडला आहे. कर चुकवेगिरीच्या तीन गुन्ह्यांमध्ये बार्सिलोना न्यायालयाने मेस्सी आणि त्याचे वडील जॉर्ज यांना दोषी ठरवले. न्यायालयाने दोघांना २१ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर मेस्सीला २० लाख युरोचा दंडही ठोठावला आहे. मेस्सी या शिक्षेविरोधात स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो.
स्पॅनिश कायद्यानुसार तुम्ही दोन वर्षांची शिक्षा नजरकैदेत राहून पूर्ण करु शकता. त्यासाठी तुरुंगात जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे मेस्सीला तुरुंगात जावे लागण्याची शक्यता कमी आहे. मेस्सीचे वडिल जॉर्ज यांना पंधरा लाख युरोचा दंड ठोठावला आहे. मेसीने चाळीस लाख युरोचा कर भरण्याचे टाळून स्पेनची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप होता. जगातील सर्वात महागडा फुटबॉल खेळाडू असणा-या मेसीवर कर घोटाळयाचा आरोप होता.
आणखी वाचा
मेसी आणि त्याचे वडिल जॉर्ज मेसी यांनी कर टाळण्यासाठी बनावट कंपन्यांच्या साखळीचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. २००७-०९ मध्ये मेसीने त्याचे इमेज राईट विकले होते त्यातून मिळालेल्या उत्पन्नात कर चुकवेगिरीचा आरोप होता. न्यायालयाने या आरोपांमध्ये मेस्सी व त्याच्या वडिलांना दोषी ठरवून २१ महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.