काठमांडू - भारत आणि नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापलेला सीमाप्रश्न पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकीकडे विवाद चर्चेद्वारे सोडवण्याच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये परस्पर सहमती बनत असतानाच आज नेपाळच्या पंतप्रधानांनी सीमाप्रश्नावरून पुन्हा एकदा आक्रमक विधान केले आहे.
'लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हा वादग्रस्त भाग आहे. त्याचा संपूर्ण भूगोलच भारताच्या कब्जात आहे. कालापानी येथे लष्कर तैनात करून भारताने तिथून लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भागांवर कब्जा केला आहे, असे नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा म्हणाले.
नेपाळचे पंतप्रधान पुढे म्हणाले की, लष्कर तैनात करून आमच्या कडून आमचा भूभाग बळकावून घेण्यात आला आहे. जोपर्यंत तिथे भारतीय लष्कर नव्हते तोपर्यंत ती जमीन आमच्याकडे होती. आता तिथे सैन्य तैनात असल्याने आम्ही तिथे जाऊ शकत नाही. एकप्रकारे त्या जमिनीवर कब्जा केलेला आहे. त्यामुळे आम्ही आमचा मित्र देश असलेल्या भारताला हे वारंवार सांगत आहोत की ती जमीन आमची आहे. आम्हाला आमची जमीन परत हवी आहे.
याबाबत चर्चेतून मार्ग निघावा, अशी आमची इच्छा आहे. मात्र चर्चेचा तोडगा तेव्हाच निघेल, जेव्हा आमची जमीन आम्हाला परत मिळेल, तेच सत्य आहे आणि त्याचा विजय होईल, आम्ही आमची जमीन मिळवून दाखवू, असेही नेपाळच्या पंतप्रधानांनी सांगितले.