इस्लामच्या दोन सर्वात पवित्र मानल्या गेलेल्या मक्का आणि मदीनाचा देश सौदी अरेबियामध्ये दारुची दुकाने उघडणार आहेत. दारु हराम मानल्या जाणाऱ्या सौदीत असे कसे शक्य झालेय असा प्रश्न सर्वांना पडू लागला आहे. परंतु सौदीचीही काही कारणे आहेत ज्यामुळे त्यांना तसे करणे भाग पडत आहे. काहीही असले तरी सौदीच्या प्रिन्सच्या या निर्णयामुळे पाकिस्तान बुचकळ्यात सापडले आहे.
पाकिस्तानमध्ये अधिकृतरित्या दारु बंदी आहे परंतु चौकाचौकात दारू विकली जाते. कायदा तर आहे पण पाळतोय कोण असा प्रश्न तिथे आहे. आता पाकिस्तानला देखील सौदीमुळे दारु बंदी उठवावी लागते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाकिस्तान देखील स्वत:ला कट्टर मुस्लिम देश मानतो. या देशात हिंदू देखील आहेत. परंतु तरीही पाकिस्तानात इस्लामात दारु हराम असल्याने बंदी आहे.
सौदीच्या राजाने राजधानी रियादमध्ये दारुच्या पहिल्या स्टोअरला मंजुरी दिली आहे. या ठिकाणी गैर मुस्लिम परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांना दारु मिळणार आहे. अद्याप पर्यटकांना दारु विकण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाहीय. येथील दारु खरेदी करण्यासाठी ग्राहकाला रजिस्टर करावे लागणार आहे. यानंतर त्याला क्लिअरन्स कोड मिळणार आहे. प्रत्येक ग्राहकाला महिन्याचा कोटा ठरवून दिला जाणार आहे.
सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे हे पाऊल मैलाचा दगड मानला जात आहे. त्यांनी अनेक धाडसी आणि क्रांतीकारी निर्णय घेतले आहेत. यामध्ये महिलांना ड्रायव्हिंग लायसन देखील आहे. महिलांना बुरखा घालण्यावर देखील सूट देण्यात आली आहे. पर्यटन आणि व्यवसाय वाढवण्यासाठी सौदी राजकुमारांनी दारू विक्रीला मान्यता दिल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
2030 सालापर्यंत सौदी अरेबियाला आपल्या अर्थव्यवस्थेचे तेलावरील अवलंबित्व कमी करायचे आहे. जगात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असून भविष्यात तेल खरेदी कमी होणार हे नक्की आहे. यामुळे सौदी पर्यटनाकडे अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. लाखो विदेशी कामगार सौदी अरेबियामध्ये काम करतात परंतु त्यापैकी बहुतेक आशिया आणि इजिप्तमधील मुस्लिम आहेत.
सौदीत स्थानिक उद्योगांना चालना देण्यावर भर दिला जात आहे. सौदी अरेबियानंतर आता पाकिस्तान सरकारवर दारूला मान्यता देण्यासाठी दबाव वाढला आहे. आतापर्यंत सौदी अरेबियाचा मार्ग अवलंबत पाकिस्तानने त्याला मान्यता दिली नव्हती, मात्र पाकिस्तानातील प्रत्येक शहरात दारू सहज उपलब्ध आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानमध्ये चीनसाठी दारू बनवली जात आहे.