वॉशिंग्टन : अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला नौदलाची सर्वोच्च अधिकारी बनली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी या पदासाठी अॅडमिरल लिसा फ्रँचेटी यांची नियुक्ती केली आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, लिसा फ्रँचेटी या अमेरिका नौदलाच्या इतिहासात हे पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला असणार आहेत. याशिवाय जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफमध्येही त्या पहिल्या महिला असतील.
अमेरिकाच्या नौदलात लिसा फ्रँचेटी यांना १९८५ मध्ये नियुक्त करण्यात आले होते. त्या सध्या नौदल ऑपरेशन्सचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. लिसा फ्रँचेटी यांच्या बायोग्राफीनुसार, त्यांनी अमेरिका नौदलाच्या कोरियाच्या कमांडर, वॉर डेव्हलपमेंटसाठी नौदल ऑपरेशन्सच्या उपप्रमुख आणि संयुक्त स्टाफची रणनीती, योजना आणि धोरण संचालक म्हणून काम केले आहे. तसेच, लिसा फ्रँचेटी यांनी दोन कॅरिअर स्ट्राइक ग्रुपचे नेतृत्व देखील केले आहे आणि सप्टेंबर २०२२ मध्ये त्या व्हाईस सीएनओ बनल्या आहेत.
"आमचे पुढचे नौदल प्रमुख म्हणून, अॅडमिरल लिसा फ्रँचेटी एक कमिशन्ड अधिकारी म्हणून आमच्या राष्ट्रासाठी ३० वर्षांची समर्पित सेवा प्रदान करतील, ज्यात नौदल ऑपरेशन्सचे उपप्रमुख म्हणून त्यांची सध्याची भूमिका आहे," असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी शुक्रवारी सांगितले. याचबरोबर, अमेरिका फ्लीट फोर्सेस कमांडचे डेप्युटी कमांडर व्हाईस अॅडमिरल जेम्स किल्बी यांना पुढील व्हाईस सीएनओ म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. तर अमेरिका पॅसिफिक फ्लीटचे कमांडर अॅडमिरल सॅम्युअल पापारो यांना इंडो-पॅसिफिक कमांडचे कमांडर म्हणून पॅसिफिकमधील अमेरिकी सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त करण्यात येत आहे, असेही ज्यो बायडन यांनी सांगितले.
दरम्यान, लिसा फ्रँचेटी यांनी आपल्या पूर्ण कारकिर्दीत ऑपरेशनल आणि पॉलिसी या दोन्ही क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. अमेरिकेच्या नौदलात फोर-स्टार अॅडमिरल पद मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. नौदल प्रमुख आणि जॉइंट चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला म्हणून त्या पुन्हा इतिहास रचतील, असे सीएनएनने जो बिडेन यांचा हवाला देत म्हटले आहे.