ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपण जनतेने दिलेली जबाबदारी सांभाळू शकलो नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. त्या केवळ 45 दिवसांसाठीच ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या. कुठल्याही ब्रिटिश पंतप्रधानाचा हा सर्वात कमी कार्यकाळ आहे. सध्या ब्रिटन आर्थिक आणि राजकीय अशा दोन्ही संकटांचा सामना करत आहे. ट्रस यांच्या पक्षातील नेतेच त्यांच्या विरोधात गेले आहेत. यानंतर वाढत्याराजकीय दबावानंतर, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिली आहे. मात्र, ब्रिटनला नवा पंतप्रधान मिळेपर्यंत त्या या पदाचा पदभार सांभाळतील.
ट्रस भलेही आता ब्रिटनच्या पंतप्रधान राहिलेल्या नाहीत. मात्र, केवळ 45 दिवसांच्या आपल्या कार्यकाळानंतर त्यांना आता आयुष्यभरासाठी पेन्शन मिळणार आहे. त्यांना दर वर्षी जवळपास 1 कोटींहून अधिक पेन्शन मिळणार आहे.
मिळणार एवढी पेन्शन -लिझ ट्रस या सर्वात कमी काळ पदावर राहणाऱ्या ब्रिटनच्या पंतप्रधान बनल्या आहेत. त्या केवळ 45 दिवसच ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या. मात्र, तरीही ब्रिटीश सरकारकडून त्यांना दरवर्षी £115,000 म्हणजेच सुमारे 1 कोटी 6 लाख 92 हजार 807 रुपये पेन्शन मिळणार आहे. खरे तर, ब्रिटीश कायद्यानुसार, माजी पंतप्रधानांना वार्षाला £115,000 पर्यंत पेन्शन मिळू शकते. या पैशातून ते कर्मचारी, कार्यालय आणि इतर खर्च काढू शकतात. मात्र, हा पैसा सरकारी कामासाठी आणि सार्वजनिक कर्तव्यांसाठी मिळतो.
ऋषी सुनक पुन्हा चर्चेत -लिझ ट्रस यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचे नाव पुन्हा चेर्चेत आले आहे. आता ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास एखादी भारतीय व्यक्ती ब्रिटनचा पंतप्रधान होण्याची ही पहिलीच वेळ असेल. बोरिस जॉनसन यांनी राजीनामा दिल्यानंतर ब्रिटेनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत लिझ ट्रस यांच्यासोबतच ऋषी सुनकही होते. मात्र, टोरी नेतृत्वाच्या लढतीत त्यांचा लिझ ट्रस यांच्याकडून पराभव झाला होता.
यामुळे द्यावा लागला राजीनामा -पंतप्रधान पदाच्या निवडणूक प्रचारात लिझ ट्रस यांनी ब्रिटनची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी जी काही आश्वासने दिली होती, तीच त्यांच्या पदासाठी त्रासदायक ठरली. त्या पंतप्रधान झाल्यापासून इंग्लंडमधील महागाई आकाशाला भीडली आहे. यामुळे ट्रस सरकारला जनतेच्या विरोधाचा मोठा सामना करावा लागला. लोकांचा विरोध आणि राकीय दबाव अर्थमंत्री क्वासी क्वार्टेंग यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर जेरमी हंट यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, याचादेखील काहीही फायदा झाला नाही आणि हळू-हळू ट्रस यांच्या पक्षातील खासदारच त्यांचा विरोध करू लागले. यानंतर स्वतः लिझ ट्रस यांना आपले पद सोडावे लागले.