लंडन :
ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा सत्तानाट्य सुरू झालं आहे. पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेऊन अवघे ४५ दिवस झालेले असताना लिझ ट्रूस (Liz Truss) यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. खुद्द लिझ ट्रूझ यांनीच याबाबतची घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली आहे. त्यामुळे आता ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान निवडीचं राजकीय चढाओढ निर्माण झाली आहे.
पक्षांतर्गत बंडखोरांचा आवाज तीव्र झाला असून ट्रूस यांच्याविरोधात पक्षाचे १०० सदस्य लवकरच अविश्वास प्रस्ताव आणू शकतात, अशी बातमी समोर आली होती. या अविश्वास प्रस्तावाच्या आधीच ट्र्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान,नव्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचा दावा अधिक भक्कम झाला आहे. सुनक हे पुढचे पंतप्रधान होऊ शकतात, असा विश्वास देशातील बुकींनाही वाटतो आहे.
"सध्याची परिस्थिती पाहता ज्या आश्वासनांसाठी मी लढा देत होते ती आश्वासनं मी पूर्ण करू शकेन असं मला वाटत नाही. मी आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असल्याची माहिती दिली आहे. ज्यावेळी मी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा देश आर्थिक पातळीवर स्थिर नव्हता. देशातील अनेक कुटुंबांना बिल कसे भरायचे याची चिंता सतावत होती. आम्ही टॅक्स कमी करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला. पण सद्यस्थिती पाहता मी या आश्वासनांची पूर्तता करू शकेनं असं वाटत नाही. त्यामुळे मी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत आहे", असं लिझ ट्रूस म्हणाल्या.