ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी गुरुवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षातील नेतृत्वाविरोधात उघडपणे बंड केल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ‘मी जनतेने दिलेली जबाबदारी सांभाळू शकले नाही. आपण कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा देत असल्याचे किंग चार्ल्स यांना सांगितले आहे," असे ट्रस यांनी म्हटले आहे. त्या केवळ 45 दिवसांसाठीच पंतप्रधान होत्या. कुठल्याही ब्रिटिश पंतप्रधानाचा हा सर्वात कमी कार्यकाळ आहे.
ब्रिटनवर आर्थिक आणि राजकीय संकटही -ट्रस यांच्या एक दिवस आधीच ब्रिटनच्या गृह मंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महत्वाचे म्हणजे, सध्या ब्रिटन आर्थिक आणि राजकीय अशा दोन्ही संकटांचा सामना करत आहे. लिझ ट्रस पंतप्रधान झाल्यापासूनच बाजारात सातत्याने घसरण दिसत आहे आणि यामुळे त्यांचा कंझर्व्हेटिव्ह पक्षही फुटताना दिसत आहे. सातत्याने वाढत असलेल्या राजकीय दबावामुळेच लिझ ट्रस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, ब्रिटनला नवा पंतप्रधान मिळेपर्यंत त्या या पदाचा पदभार सांभाळतील.
जनतेच्या विरोधाचा सामना -महत्वाचे म्हणजे पंतप्रधान पदाच्या निवडणूक प्रचारात लिझ ट्रस यांनी ब्रिटनची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी जी काही आश्वासने दिली होती, तीच त्यांच्या पदासाठी त्रासदायक ठरली. त्या पंतप्रधान झाल्यापासून इंग्लंडमधील महागाई आकाशाला भीडली आहे. यामुळे ट्रस सरकारला जनतेच्या विरोधाचा मोठा सामना करावा लागला. लोकांचा विरोध आणि राकीय दबाव अर्थमंत्री क्वासी क्वार्टेंग यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर जेरमी हंट यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, याचादेखील काहीही फायदा झाला नाही आणि हळू-हळू ट्रस यांच्या पक्षातील खासदारच त्यांचा विरोध करू लागले.
डेली मेलने दिलेल्या एका वृत्तानुसार, पक्षाच्या पाच पैकी चार कार्यकर्त्यांनी पीएम योग्य पद्धतीने काम करत नसल्याचे म्हटले आहे आणि 55 टक्के म्हणत होते, की त्यांनी जायला हवे. तसेच केवळ 38 टक्के जणांनीच त्या रहाव्यात असे म्हटले होते. एवढेच नाही, तर ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या जागी चार वरिष्ठ मंत्र्यांची नियुक्त करण्यात यावी, असा सल्ला टोरी खासदारांनी दिला आहे. कारण, सध्या पक्ष एकसंध ठेऊ शकेल, असा उत्तराधिकारी पक्ष शोधत आहे. त्यामुळे आता ब्रिटनचे राजकारण येणाऱ्या काळात कुठल्या देशेने जाते, हे बघणे महत्वाचे ठरेल.