कोरोनाने जगभरात मोठे रुप धारण केले आहे. मंकीपॉक्सने देखील १२ देशांमध्ये हजेरी लावल्याने जगभरातील देशांचे धाबे दणाणले आहेत. सौदी अरेबियाने कोरोनाच्या भीतीने भारतासह १६ देशांच्या प्रवाशांवर बंदी घातली आहे.
सौदीच्या जनरल डायरक्टोरेट ऑफ पासपोर्ट कार्यालयाने शनिवारी हे आदेश जारी केले आहेत. या देशांमध्ये ईराण, तुर्की, येमेन, व्हिएतनाम, कांगो, इथिओपिया, व्हेनेझुएला सारख्या देशांचा समावेश आहे. सौदी गॅझेट या वृत्तपत्राने आपल्या बातमीत ही माहिती दिली आहे.
सौदीचे जे लोक गैर अरब देशांची यात्रा करू इच्छितात त्यांच्या पासपोर्टची वैधता ही सहा महिन्यांपेक्षा जास्त असली पाहिजे. तर अरब देशांमध्ये प्रवास करण्यासाठी त्यांच्या पासपोर्टची वैधता ही ती महिन्यांपेक्षा जास्त असायला हवी. याचबरोबर आखाती संघटनेच्या देशांत प्रवास करायचा असेल तर त्यांच्या राष्ट्रीय ओळखपत्राची वैधता ही तीन महिन्यांपेक्षा जास्त असायला हवी असे नियम करण्यात आले आहेत.
सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाने जनतेला भरवसा दिला आहे की, अद्याप देशात मंकीपॉक्सचा कोणताही रुग्ण सापडलेला नाही. आरोग्य मंत्री अब्दुल्ला असीरी यांनी सांगितले की, सरकारकडे मंकीपॉक्स संशयीत रुग्णांसाठी निरिक्षणात ठेवण्याची यंत्रणा आहे. जर मंकीपॉक्सचा रुग्ण सापडलाच तर देशाकडे त्याचा सामना करण्याची, उपचार करण्याची क्षमता आहे.
शनिवारपर्यंत 12 देशांमध्ये मंकीपॉक्सच्या 92 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. सौदी अरेबियात लाखो भारतीय काम करतात तसेच ये जा करतात. या प्रवास बंदीमुळे त्यांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.