नवी दिल्ली : अचानक आलेल्या चौथ्या कोरोना लाटेमुळे युरोपातील पर्यटन क्षेत्राला पुन्हा एकदा जबर तडाखा बसला असून, लक्षावधी लोकांचे ख्रिसमसच्या सुट्यातील प्रवासाचे नियोजन कोलमडले आहे.
कोरोना संपला असल्याचे मानले जात असतानाच, युरोपात अचानक रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ऑस्ट्रिया सरकारने पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन लावले आहे. चौथ्या लाटेमुळे लॉकडाऊन लावणारा हा युरोपातील पहिला देश ठरला आहे. जर्मनीतील परिस्थितीही विकोपाला गेली असून, तेथेही लॉकडाऊन लावण्याचा विचार सुरू आहे. जर्मनीच्या मावळत्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी सांगितले की, ‘नाट्यमयरीत्या आलेल्या चौथ्या लाटेने जर्मनीला जबर तडाखा दिला आहे.’
नेदरलँडमध्ये गुरुवारी अचानक २३ हजार नवे रुग्ण सापडले. डिसेंबर २००० मध्ये कोरोना शिखरावर असतानाही नेदरलँडमधील रुग्णसंख्या १३ हजार होती. तेथे आता अंशत: लॉकडाऊन लावण्यात आले आहे. पूर्व युरोपातील अनेक देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.
सूत्रांनी सांगितले की, चौथ्या लाटेचा मोठा फटका नाताळाच्या सुट्यातील नियोजित प्रवासास बसणार आहे. एकट्या ब्रिटनमधून २,५०,००० लोक नाताळाच्या काळात दोन ते तीन देशात प्रवास करतात. या प्रवाशांना आपल्या प्रवासाचे फेरनियोजन करावे लागणार आहे. लाट लांबल्यास प्रवास रद्दच होतील. नाताळच्या प्रमुख बाजारापैकी एक असलेल्या म्युनिक येथील सगळे नियोजन यंदाही रद्द झाले आहे. यंदाचा स्की हंगामही धोक्यात आला आहे.
पूर्व युरोपात लसीकरणाचे प्रमाण खूपच कमी असले आहे. मात्र, ऑस्ट्रिया जर्मनी आणि नेदरलँड येथील ६४ ते ७३ टक्के नागरिकांचे पूर्णत: लसीकरण झालेले आहे. ब्रिटनमधील लसीकरणाचे प्रमाण ६८ टक्के आहे.
नवी दिल्ली - देशात आणखी १०,३०२ जणांना कोविड-१९ विषाणूची बाधा झाली असून एकूण बाधितांचा आकडा आता ३,४४,९९,९२५ वर गेला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या मात्र घटून १,२४,८६८ झाली आहे. मागील २४ तासांत २६७ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूंची संख्या आता ४,६५,३४९ झाली आहे.
मागील २४ तासांत मृत्यू पावलेल्या २६७ लोकांपैकी २०४ जण केरळातील, तर १५ जण महाराष्ट्रातील आहेत. कोविड-१९ मुळे मरण पावलेल्यांपैकी ७० टक्के मृत्यू बहुरुग्णतेमुळे झाले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशात आतापर्यंत ११५.७९ कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत.