लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये पंतप्रधान नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळालं आहे. मात्र मागच्या दोन निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेल्या भाजपाला केवळ २४० जागांवर समाधान मानावं लागलं आहे. असं असलं तरी केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार सत्ता स्थापन करेल अशी शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून ट्विट करून मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात जस्टिन ट्रुडो म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी अभिनंदन. कॅनडा, मानवाधिकार, विविधता आणि कायद्याच्या राज्यावर आधारित संबंधांना पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्या सरकारसोबत काम करण्यास तयार आहे.
गेल्या काही वर्षांपासून भाजपा आणि कॅनडामधील संबंध हे तणावपूर्ण राहिलेले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरून दोन्ही देशांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले आहेत. त्यादरम्यान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी गतवर्षी कॅनडाच्या संसदेमध्ये बोलताना निज्जर याच्या हत्येमध्ये भारतातील यंत्रणांचा हात असल्याचा आरोप केला होता. भारत सरकारच्या एजंट्सनी १८ जून २०२३ रोजी कॅनडामधील ब्रिटिश कोलंबियातील सर्रे येथे गुरू नानक शीख गुरुद्वाराबाहेर निज्जर याची हत्या केली होती, आसा दावा ट्रुडो यांनी केला होता.