देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमधील तीन टप्प्यातील मतदान आटोपलं आहे. तसेच देशातील १५ राज्यांमधील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून, २८३ लोकसभा मतदारसंतील मतदान आटोपलं आहे. दरम्यान, देशातील निम्म्या जागांवरील मतदान आटोपलं असतानाच रशियाने केलेल्या एका दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. अमेरिकाभारतातील लोकसभा निवडणुकीमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचा सनसनाटी दावा रशियाने केला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान, भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचे रशियाने म्हटले आहे.
याबाबत रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जाखारोव्हा यांनी सांगितले की, अमेरिका भारतातील राजकीय चित्राला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेला भारताची राजकीय ओळख आणि इतिहासाची जाण नाही. जाखारोव्हा यांनी हे विधान भारतामधील धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या अहवालासंदर्भात केलं आहे.
जाखारोव्हा पुढे म्हणाल्या की, भारतातील धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेकडून सातत्याने बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. भारतातील अंतर्गत राजकीय चित्राला धक्का लावणे आणि त्यामधून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अडथळे आणणे हा त्यामागील हेतू आहे. अमेरिकेकडून सुरू असलेल्या हालचाली ह्या भारताच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप होत असल्याचे दर्शवित आहेत. तसेच ही बाब भारताच्या दृष्टीने अपमानजनक आहे, असेही जाखारोव्हा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मारिया जाखारोव्हा खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येच्या प्रयत्नांबाबत भारतावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत म्हणाल्या की, अमेरिकेने या प्रकरणात भारतीय नागरिकांचा सहभाग असल्याबाबत कुठलेही सबळ पुरावे दिलेले नाहीत. पुराव्यांच्या अभावी अशा प्रकारचे दावे मान्य करता येण्यासारखे नाहीत.