लंडन: जग मेट्रोपर्यंत पोहोचलं आहे आणि तुम्ही अजूनही रिक्षात आहात, अशा शब्दांमध्ये मानवाधिकार कार्यकर्ते आरिफ अजाकियानं पाकिस्तानला घरचा आहेर दिला आहे. भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेचं कौतुक करताना त्यांनी पाकिस्तानला भविष्याचा विचार करण्याचाही सल्ला दिला. जे प्रयत्न करतात, तेच अपयशी ठरतात, असं म्हणत अजाकिया यांनी पाकिस्तानला टोला लगावला आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेची पाकिस्ताननं खिल्ली उडवली होती. इस्रोचा विक्रम लँडरशी संपर्क तुटताच पाकिस्तानमधील अनेक नेत्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या डोळ्यात लंडनस्थित मानवाधिकार कार्यकर्ते आरिफ अजाकिया यांनी झणझणीत अंजन घातलं आहे. 'चांद्रयान-2 भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. भारताच्या मोहिमेचं नासानंदेखील कौतुक केलं आहे. जे प्रयत्न करतात, त्यांनाच अपयश येतं,' असं अजाकिया यांनी म्हटलं. अजाकिया यांनी कायम पाकव्याप्त काश्मीरमधील मानवाधिकारावर भाष्य केलं आहे. याआधीही अनेकदा त्यांनी पाकिस्तानी सरकारवर कडाडून टीका केली आहे. चांद्रयान-2 मोहिमेबद्दल बोलताना अजाकिया यांनी पाकिस्तानच्या मंत्र्यांवर कडाडून टीका केली. पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी, रेल्वे मंत्री शेख राशीद यांचा अजाकिया यांनी चांगलाच समाचार घेतला. चौधरी, राशीद तुम्ही काय करत आहात? तुम्ही लोकांना फक्त मूर्ख बनवत आहात. फवाद चौधरी तुम्ही विज्ञान मंत्री आहात जरा रिक्षातून बाहेर या. देशाच्या भविष्याचा विचार करा. संपूर्ण जग आज मेट्रोतून प्रवास करतंय आणि तुम्ही अजूनही रिक्षात आहात. हीच तुमची लायकी आहे, अशा कठोर शब्दांमध्ये अजाकिया पाकिस्तानच्या मंत्र्यांवर बरसले.