ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 19 - दहशतवादी हल्ल्यांना हादरलेल्या ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये पुन्हा एकदा हिंसक घटना घडली आहे. मशिदीबाहेर एका गाडीने पादचा-यांना चिरडलं असून यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, फिन्सबरी पार्क येथे असलेल्या मशिदीतून काही मुस्लिम नमाज पडून बाहेर येत होते, त्याचवेळी एका वाहनचालकाने पादचा-यांच्या अंगावर गाडी घातली. वाहनचालकाने जाणुनबुजून अंगावर गाडी घातल्याचा दावा काहीजण करत आहेत. पोलिसांनी मात्र या माहितीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
अनेकांचं म्हणणं आहे की, हल्ला मुस्लिम वेलफेअर हाऊसच्या बाहेर झाला. मात्र त्यावेळी काही मुस्लिम फिन्सबरी पार्क येथील मशिदीतून बाहेर येत असल्याने संभ्रमाची स्थिती आहे.
#London: Casualties after vehicle hits pedestrians, one person arrested: Police at the scene of incident at Finsbury Park pic.twitter.com/hJcOByfKqm— ANI (@ANI_news) June 19, 2017
"निर्दोष मुस्लिमांना जाणुनबुजून टार्गेट करण्यात आलं. जर प्रशासन अधिकृत माहिती देत असेल, तर या हल्ल्याला दहशतवादी हल्ला जाहीर केलं पाहिजे. जर खरंच व्यवस्थित विचार करुन लोकांवर हल्ला केला असेल, तर हा दहशतवादी हल्ला आहे यामध्ये कोणतंच दुमत नाही", असं रमजान फाऊंडेशन मुस्लिम संघटनेचे मुख्य कार्यकारी मोहम्मद शाफिक बोलले आहेत.
घटनास्थळी राहणा-या एका महिलेने सांगितलं की, "मी खिडकीबाहेर पाहिलं तेव्हा लोक ओरडत होते. खूप धावपळ सुरु होती. एका गाडीने लोकांना चिरडलं असल्याचं लोक सांगत होते. फिन्सबरी पार्कमधील मशिदीच्या बाहेर एक गाडी उभी होती. कदाचित त्याच गाडीने लोकांना चिरडलं होतं".
या अपघातात 10 हून जास्त जण जखमी झाल्याची माहिती आहे. गाडी अजून मोठं नुकसान करेल याआधी घटनास्थळी उपस्थितांनी गाडीवर नियंत्रण मिळवलं आणि चालकाला गाडीबाहेर काढलं. स्थानिक पोलिसांनी ही मोठी घटना असल्याचं सांगितलं आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री 12.20 वाजता ही घटना घडली. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं असून तपास सुरु आहे.