लंडन : ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये गजबजलेल्या बाजारपेठेत लंडन ब्रिजवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात ८ जण ठार तर ४८ जण जखमी झाले आहेत. हातात चाकू आणि नकली आत्मघातकी जॅकेट परिधान करून हे अतिरेकी आले होते. ८ जून रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी तीनही हल्लेखोरांना गोळ्या घालून ठार मारले आहे. हा हल्ला शनिवारी रात्री स्थानिक वेळेनुसार, दहाच्या सुमारास झाला. या हल्लेखोरांनी एक व्हॅन लंडन ब्रिजवर गर्दीत घुसविली. जवळच्याच बाजारपेठेत त्यांनी नागरिकांवर चाकूने हल्ला केला. प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीन जण व्हॅनमधून आले होते आणि ‘हे अल्लाहसाठी आहे’ असे ते म्हणत होते. पोलिसांनी सांगितले की, जखमी ४८ नागरिकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला आठ मिनिटे सुरू होता. ज्या भागात बार, रेस्टॉरंट, क्लब आहेत त्याच भागात हा हल्ला झाला. सहायक पोलीस आयुक्त मार्क राउली यांनी सांगितले की, सशस्त्र अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करत तिन्ही हल्लेखोरांना आठ मिनिटांच्या आत गोळ्या घालून ठार केले. आत्मघातकी हल्लेखोर वापरतात तसे जॅकेट या अतिरेक्यांनी परिधान केले होते. पण ते नकली असल्याचे नंतर स्पष्ट झाले. अतिरेकी हल्ला म्हणून आम्ही याकडे पाहत आहोत आणि त्यादृष्टीने तपासही सुरू केला आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोेणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पूर्व लंडनमधील बर्किंगमधून या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे. या तीन हल्लेखोरांपैकी एकाच्या फ्लॅटवर धाड टाकण्यात आली. परिवहन (पान १३ वर)(पान १ वरून) विभागाच्या पोलिसांनी सांगितले की, त्यांचा एक अधिकारी या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. पण, त्याच्या जिवाला धोका नाही. काही दिवसांपूर्वीच २२ मे रोजी मॅन्चेस्टरमध्ये आत्मघातकी हल्ला झाला होता. यात २२ जण ठार तर, ११६ जण जखमी झाले होते. २२ वर्षीय सलमान अबेदी हा यातील हल्लेखोर होता. ट्रम्प - तेरेसा मे यांच्यात फोनवर चर्चा वॉशिंग्टन : लंडनमधील अतिरेकी हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान तेरेसा मे यांना फोन करुन या प्रकरणात तपासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. व्हाईट हाउसने म्हटले आहे की, अध्यक्षांनी पोलिसांच्या साहसाचे कौतुक केले. यातील जबाबदार व्यक्तींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. मोदी यांनी व्यक्त केले दु:ख नवी दिल्ली : लंडनमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ला प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेचा निषेध करताना हा प्रकार धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोदी म्हणाले की, मृत कुटुंबीयांच्यासोबत आम्ही आहोत. जखमींसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. >निवडणुका ठरल्यावेळीच - तेरेसा मे८ जून रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीवर हिंसाचाराचे सावट पसरले असून राजकीय पक्षांनी प्रचार मोहीम स्थगित केली आहे. तथापि, निवडणुका ठरल्याप्रमाणे नियोजित वेळीच होतील, असे ब्रिटनच्या पंतप्रधान तेरेसा मे यांनी स्पष्ट केले आहे. आपत्कालीन बैठकीत बोलताना तेरेसा मे म्हणाल्या की, हिंसाचाराला लोकशाही प्रक्रियेत व्यत्यय आणू देणार नाही. इस्लामी कट्टरवाद्यांच्या चुकीच्या विचारामुळे असे हल्ले होत आहेत. ‘झाले ते पुरे झाले’ असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.
लंडनमध्ये पुन्हा अतिरेकी हल्ला
By admin | Published: June 05, 2017 6:10 AM