लंडन - बँकांचे हजारो कोटी रूपयांचा गंडा घालून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय माल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. विजय माल्याच्या प्रत्यार्पणाला लंडनमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयाने परवागनी दिली आहे. माल्याच्या प्रत्यापर्णाला लंडनमधील न्यायालयाने दिलेली परवानगी हे सीबीआयच्या प्रयत्नांना मिळालेले मोठे यश मानले जात आहे.
‘किंगफिशर एअरलाइन्स’च्या नावे घेतलेली बँकांची सुमारे ९,००० हजार कोटींची कर्जे बुडवून विजय माल्या हा इंग्लंडमध्ये पसार झाला होता. माल्या देशाबाहेर पळून गेल्याने भारत सरकारची मोठी नाचक्की झाली होती. तेव्हापासून माल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. या निकालाच्या वेळी हजर राहण्यासाठी ‘सीबीआय’चे सहसंचालक ए. साई मनोहर यांच्या नेतृत्वाखालील ‘सीबीआय’ व ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त तुकडी येथे आली आहे.
दरम्यान, हा खटला आता ब्रिटनच्या गृहविभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. आता ब्रिटनचा गृह विभाग त्यावर पुढील निर्णय घेईल. तसेच या खटल्याविरोधात ब्रिटनच्या उच्च न्यायालयात अपील करण्याची संधीही विजय माल्याला मिळणार आहे. अपीलासाठी माल्याकडे 14 दिवसांची मुदत असून, माल्याने अपील केल्यास प्रत्यार्पणाला उशीर होऊ शकतो.
निकालानंतर पुढे काय?न्यायाधीश ऑर्बथनॉट यांचा निकाल मल्ल्याच्या थेट प्रत्यार्पणासंबंधी नसेल. त्यासाठी आवश्यक सर्व बाबींची समर्पक पूर्तता होते किंवा नाही एवढ्यापुरताच तो निकाल मर्यादित असेल. थोडक्यात मल्ल्याचे प्रकरण प्रत्यार्पणाच्या पुढील कारवाईसाठी ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जाविद यांच्याकडे पाठवायचे की नाही, याविषयी हा निकाल असेल. हा निकाल ज्याच्या विरोधात जाईल तो पक्ष त्याविरुद्ध उच्च न्यायालयात १४ दिवसांत अपील करू शकेल. असे अपील केले गेले नाही तर गृहमंत्री प्रत्यार्पणाचा आदेश काढू शकतील व तसा आदेश निघाल्यावर २८ दिवसांत मल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण होऊ शकेल.ऑर्थर रोड जेलची बरॅक :भारतातील तुरुंग सुरक्षित नाहीत. तेथे कैदी कोंबल्याने जीव गुदमरतो. यामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होईल, असाही मुद्दा मल्ल्याने मांडला. भारत सरकारने मल्ल्यासाठी मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहातील बरॅक क्र. १२ ची निवड केली व त्या बरॅकचा व्हिडिओही सादर केला. त्यातून मोठ्या खिडक्यांमुळे भरपूर उजेड व हवा मिळेल. शिवाय बरॅकच्या आवारात मल्ल्याला फेरफटकाही मारता येईल. त्याच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व टीव्ही असेल व ग्रंथालयाचाही त्याला वापर करता येईल, हे सरकारने सांगितले. परंतु मल्ल्याने या व्यवस्थेलाही नाके मुरडली.सुनावणीतील मुख्य मुद्दे काय आहेत?‘किंगफिशर एअरलाइन्स’ची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे बनावट चित्र निर्माण करून मल्ल्याने बँकांकडून ही कर्जे घेतली. ती परत करण्याची त्याची मुळात कधीच इच्छा नव्हती. त्यामुळे हे पैसे अन्यत्र वळवून, प्रकरण अंगाशी आल्यावर त्याने देशातून पोबारा केला, असा भारत सरकारच्या युक्तिवादाचा मुख्य रोख होता.तर मल्ल्याने असे दाखविण्याचा प्रयत्न केला की, कर्जांची वेळेवर परतफेड न होणे हा निव्वळ व्यापारी घाट्याचा भाग होता. मालमत्ता विकून पैसे परत करण्याचा प्रस्ताव आपण पूर्वी ही दिला होता व आजही सर्व मुद्दल परत करण्याची आपली तयारी आहे, असा बचाव घेतला.