दोहा : आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्र एक मोठा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. आजपर्यंत अशक्य असलेला सर्वात लांबीचा टप्पा विनाथांबा पार करण्याची योजना प्रत्यक्षात येणार आहे. सिडनी ते लंडन हे तब्बल 16 हजार 983 किमींचे अंतर 20 तासांत विनाथांबा कापण्यासाठी जगातील आघाडीच्या विमान निर्मात्या कंपन्या ऑस्ट्रेलियाच्या क्वांटास एअरवेजच्या व्यवस्थापनाशी चर्चा करत आहेत. जर ही विमानसेवा यशस्वी झाली तर ती जगातील सर्वाधिक लांबीचे अंतर असणारी पहिली असणार आहे.
वर्षभरापूर्वी क्वांटास एअरवेजचे कार्यकारी अधिकारी एलन जॉएस यांनी बोईंग आणि एअरबस या बड्या विमान निर्मात्या कंपन्यांना सिडनीवरून लंडन किंवा न्यूयॉर्कला थेट जाऊ शकणारी विमाने बनविण्याचे आव्हान दिले होते. विमान कंपन्यांनी अशा प्रकारचे विमान बनविल्याचे एलन यांनी सांगितले आहे.
हे विमानही मोठे असल्याने या विमानातून एकावेळी 300 प्रवासी आपल्या सामानासह प्रवास करू शकणार आहेत. सिडनी आणि लंडनला जोडणारे हे विमान 2022 मध्ये आपले पहिले उड्डाण करेल. जर हे उड्डाण यशस्वी झाले तर अमेरिका, युरोप आणि ऑफ्रिकेच्या मुख्य शहरांना ऑस्ट्रेलियाहून थेट विमानसेवा पुरविता येणार असल्याचे एलन यांनी सांगितले.
या विमानाच्या केबिनमध्येही बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये व्यायामशाळा, बार, मुलांसाठी खेळणी, झोपण्यासाठी बर्थही देण्याची योजना आहे. यावरून हे विमान किती विशालकाय असेल याची कल्पना आली असेल. तसेच एवढ्या लांबीचे अंतर एका टप्प्यात कापण्यासाठी विमानाला इंजिनही दमदार लागणार आहेत. यामुळे इंधन साठाही तेवढाच मोठा ठेवावा लागणार आहे. यामुळे या विमानाचे वजनही नेहमीच्या एअरबस विमानांपेक्षा दुपटीएवढे असण्याची शक्यता आहे.
1935 मध्ये साडेबारा दिवस लागलेले...विमान कंपन्यांनी 20 तासांत तब्बल 17 हजार किमी कापण्यापर्यंत मजल मारलेली असली करीही एकेकाळी ऑस्ट्रेलियाहून सुटलेल्या विमानाला लंडनला पोहोचायला तब्बल साडे बारा दिवस लागले होते. 1935 मध्ये ही फ्लाईट गेली होती. या विमानाला 30 ठिकाणी थांबावे लागले होते.
जगभरातील आतापर्यंतच्या सर्वात लांबीच्या फ्लाईट्स...दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को ही फ्लाईट 16 तासांमध्ये 15,140 किमी अंतर कापते. तर दोहा ते ऑकलंड ही फ्लाईट 17.3 तासांत 14,539 किमी अंतर पार करते. दुबई ते ऑकलंड 17 तासात 14200 किमी, लॉस एंजेलिस ते सिंगापूर 17.55 तासात 14,114 किमी तर डग्लास ते सिडनी फ्लाईट 17.1 तासात 13,799 किमी अंतर कापते.