वॉश्गिंटन – गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यात सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पुन्हा भाष्य केले आहे, अमेरिकेच्या जो बायडेन प्रशासनाने सोमवारी निवेदनात म्हटलंय की, चीनकडून शेजारील राष्ट्रांना घाबरवणं आणि धमकावण्याच्या प्रकारावरून अमेरिका चिंतेत आहे. त्याचसोबत भारत-चीन सीमेवरील परिस्थितीवर अमेरिका लक्ष ठेऊन असल्याची ताकीद अमेरिकेने ड्रॅगनला दिली आहे.
व्हाइट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या एमिली जे होर्न म्हणाल्या की, आम्ही सीमेवरील परिस्थितीवर नजर ठेऊन आहोत, भारत आणि चीन यांच्या दोन्ही सरकारमध्ये चर्चा सुरू असल्याची आम्हाला माहिती आहे, सीमावादावर शांततामय मार्गाने तोडगा काढण्यासाठी संवाद गरजेचा आहे, त्याचं आम्ही समर्थन करतो. मात्र शेजाऱ्यांना धमकावणं आणि दहशत पसरवणं यामुळे आम्ही चिंतेत आहोत.
भारताच्या हद्दीत घुसून त्यांच्या जमिनीवर कब्जा करण्याच्या चीनच्या प्रयत्नावर पत्रकारांनी होर्न यांना प्रश्न विचारला होता, त्यावेळी त्या म्हणाल्या की, बीजिंगद्वारे शेजारच्या देशांना भय घालणे आणि धमकावणे यामुळे आम्ही चिंतेत आहोत. हिंद महासागर परिसरात शांतता, समृद्धी आणि सुरक्षा प्रस्थापित ठेवण्यासाठी आम्ही मित्रांच्या, भागीदारांच्या आणि सहकाऱ्यांसोबत उभे राहू असं अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
भारत-चीन सीमेवर सुरु असलेल्या तणावाच्या काळात बायडेन प्रशासनाकडून पहिल्यांदाच प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसद अधिवेशनाच्या सुरूवातीला संबोधित करताना म्हटलं होतं की, देशाच्या हितासाठी आणि रक्षणासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. सरकार नेहमी सतर्क आहे. वास्तविक नियंत्रण रेषेवर भारताचं सैन्यबल तैनात असून देशाची एकता आणि अखंडतेला आव्हान देणाऱ्या शक्तीविरोधात लढण्यासाठी तयार आहोत.