ऑनलाइन लोकमत
ब्रसेल्स, दि. २२ - ब्रसेल्स विमानतळ मंगळवारी दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी हादरले. यावेळी विमानतळावरील भीषण परिस्थितीचा सामना करणा-या एका नागरीकाने समोरचे दृश्य युद्धासारखे असल्याचे सांगितले. स्फोट होण्याच्या १० मिनिट आधी हा प्रवासी जिनिव्हावरुन आलेल्या विमानातून उतरला होता.
स्फोटानंतरचे दृश्य अत्यंत वेदनादायी होते. स्फोट इतका शक्तीशाली होता की, विमानतळाचे छप्पर खाली कोसळले. सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. जखमी प्रवासी वेदनेने कळवळत होते. सामान अस्ताव्यस्त पडले होते. आम्ही ढिगा-यावरुन चालत होतो. एकूणच युद्धाची स्थिती दर्शवणारे दृश्य होते असे या प्रवाशाने बीएफएम वाहिनीला सांगितले.
माएलबीक मेट्रो स्थानकाच्या प्रवेशव्दाराजवळ तिसरा शक्तीशाली स्फोट झाला. युरोपियन युनियनच्या मुख्यालयाजवळ हे स्थानक आहे. तिथेही असेच दृश्य होते. नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य संशयिताला ब्रसेल्समधून अटक झाल्यानंतर हा हल्ला झाला आहे.