लंडन : येथील हॅटन गार्डनमधील हिरे व रत्नांनी भरलेला भूमिगत सुरक्षा कक्ष (व्हॉल्ट) फोडून चोरट्यांनी २०० दशलक्ष पौंड म्हणजेच सुमारे १८ अब्ज रुपयांची लूट केली. ईस्टरनिमित्तच्या सुट्यांची संधी साधत चोरट्यांनी हा हात मारला. हॅटन गार्डन लंडनमधील हिरे व इतर रत्नांच्या व्यापाराचे मुख्य केंद्र आहे. येथील व्यापारी हिरे व इतर रत्ने सुरक्षित ठेवण्यासाठी हॅटन गार्डन सेफ डिपॉझिट लि.च्या भूमिगत सुरक्षा कक्षाचा (व्हॉल्ट) उपयोग करतात. ईस्टरच्या सुट्यांमुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हिरे व दागिने हॅटन गार्डनच्या भूमिगत सुरक्षा कक्षामध्ये ठेवले होते. त्यामुळे प्रचंड ऐवज लंपास झाल्याची भीती व्यक्त होत आहे.चोरीचे वृत्त ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच घसरली. नाईटब्रीज येथील सराफा व्यापारी मायकेल मिलर म्हणाले की, माझे ५० हजार पौंडांचे दागिने लंपास झाले असण्याची शक्यता आहे. व्यापारी त्यांच्या गुप्त लॉकरमध्ये किती ऐवज होता हे उघड न करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे चोरट्यांनी नेमका किती ऐवज लुटला हे पोलिसांना कधीही समजू शकणार नाही. हॅट्टन गार्डन परिसरातील लॉकरला लक्ष्य बनविण्यात येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी १९७५, १९८७ व २००३ मध्ये लॉकर पळविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)
लंडनमध्ये झाली तब्बल १८ अब्ज रुपयांची लूट
By admin | Published: April 09, 2015 12:39 AM