Los Angeles Fire : मागील काही दिवसांपासून अमेरिकेतील लॉस एंजेलिस आगीच्या विळख्यात आले आहे. जंगलात लागलेल्या आग रहिवासी भागात पसरली असून, या आगीमुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 12 हजाराहून अधिक इमारती जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान, या भीषण आगीमुळे परिस्थिती आणखी बिकट होईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच, अनेक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.
लॉस एंजेलिसच्या जंगलातील आगीशी संबंधित 10 मोठी अपडेट्ससध्या लॉस एंजेलिस काउंटीमध्ये अंदाजे 36,000 एकर जमीन अजूनही आगीच्या विळख्यात आहे. या आगीने आतापर्यंत 5,300 हून अधिक इमारतींचे नुकसान झाले आहे.
लॉस एंजेलिसच्या पूर्वेकडील ईटन कॅनियन आणि हायलँड पार्कमधील शाळा आणि घरांना आग लागली आहे. दोन प्राथमिक शाळा आणि पॅलिसेड्स चार्टर हायस्कूलच्या काही भागांचे नुकसान झाले. आगीने अंदाजे 14,000 एकर जमीन नष्ट केली, तर 5,000 हून अधिक इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.
अमेरिकेतील दुसरी सर्वात मोठी शाळा लॉस एंजेलिस युनिफाइड स्कूल डिस्ट्रिक्टने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना धोकादायक हवेपासून गुवाचवण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारी शाळा बंद ठेवल्या. श्वसनाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या मुलांसाठी ही हवा हानिकारक असू शकते, त्यामुळे शाळेने हा निर्णय घेतला.
पॅसिफिक पॅलिसेड्सचे रहिवासी केनेथ यांनी सिन्हुआला सांगितले की, आम्हाला परिसर रिकामा करावा लागला, त्यामुळे आमचे जीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण शहर ठप्प आहे, पण निदान आम्ही जिवंत असल्याचे समाधान आहे.
मनोरंजन उद्योगाला आग, वीज खंडित आणि विषारी हवेचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक चित्रपट आणि टीव्ही शूट्स रद्द करण्यात आले आहेत. यासोबतच अनेक प्रीमियर आणि कार्यक्रमही रद्द करावे लागले.
येत्या काही दिवसांत ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. एलए टाईम्सने एका हवामान तज्ज्ञाच्या हवाल्याने म्हटले की, आज रात्री आणि सोमवार ते बुधवारपर्यंत वारे अधिक मजबूत होतील, त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी या विनाशाला युद्धाची उपमा दिली आहे. लूटमार रोखण्यासाठी रिकामी केलेल्या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, किमान दोन डझन लोकांना अटक करण्यात आली आहे.
कॅनडाबरोबरच मेक्सिकोनेही कॅलिफोर्नियातील बचाव आणि अग्निशमन कार्यात सहभाग घेतला आहे. मेक्सिकोमधील 14,000 हून अधिक अग्निशामक पॅलिसेड्सच्या आगीशी लढण्यासाठी अमेरिकेत आहेत.