वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मॅडीसन स्क्वेअर गार्डनप्रमाणे डोळे दिपवून टाकणाऱ्या स्वागत समारंभाची कॅलिफोर्नियातील भारतीय-अमेरिकींनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मोदी सप्टेंबर महिन्यात सिलिकॉन व्हॅलीचा दौरा करणार असून राज्याला भेट देणारे ते दुसरे भारतीय पंतप्रधान आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी मोदी अमेरिकेत येणार आहेत. आमसभेनंतर सिलिकॉन व्हॅलीला भेट देऊन ते तंत्रज्ञान उद्योजकांसह भारतीय-अमेरिकींना मार्गदर्शन करणार आहेत. सॅन जोस येथील सॅप सेंटरमध्ये २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी मोदींचे भव्य स्वागत करण्याचे आमचे नियोजन आहे. मोदींचे भाषण ऐकण्यासाठी २० हजारांहून अधिक लोक गोळा होण्याची शक्यता आहे, असे इंडो-अमेरिकन कम्युनिटी आॅफ वेस्ट कोस्ट यूएसएचे खंडेराव कंद यांनी सांगितले. सिलिकॉन व्हॅलीत मोदींचे भव्य स्वागत करण्यासाठी भारतीय - अमेरिकी संघटनांच्या प्रतिनिधींची सनीवाले, कॅलिफोर्निया येथे पहिली बैठक झाली. (वृत्तसंस्था)
मोदींच्या स्वागताची सिलीकॉन व्हॅलीत जोरदार तयारी
By admin | Published: July 21, 2015 12:18 AM