बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचारानंतर तेथील हिंदूंची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या अंतरीम सरकारला हिंदूंची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आवाहन केले होते. यातच आता, बांगलादेश सरकारने दुर्गापूजा मंडपांमधील विधी दरम्यान वापरण्यात येणारी वाद्ये आणि लाऊडस्पीकर, अजान आणि नमाज दरम्यान बंद ठेवण्याचे फरमान जारी केले आहे. बांगलादेश सरकारच्या या आदेशाला विरोधही होत आहे.
बांगलादेश ट्रिब्यूनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बांगलादेशच्या गृह विभागाचे सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) मोहम्मद जहांगीर आलम चौधरी यांनी, अजान आणि नमाज दरम्यान दुर्गापूजा मंडपांमध्ये वापरलेली जाणारी वाद्ये आणि लाऊडस्पीकर बंद करावीत, असा आदेश मंगळवारी जारी केला आहे. एवढेच नाही, तर अजानच्या पाच मिनिटे आधी म्यूझिक सिस्टिम बंद करणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
बांगलादेश पश्चिम बंगालला लागून आहे. यामुळे तेथे राहणाऱ्या हिंदूंची दुर्गा मातेवर अनन्य श्रद्धा आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, यावर्षी बांगलादेशात 32,666 पूजा मंडप उभारण्यात येणार आहेत. यांपैक ढाका दक्षिण शहरात 157 आणि उत्तर सिटी कॉर्पोरेशनमध्ये 88 मंडप असतील. गेल्या वर्षी ही संख्या 33,431 एवढी होती. मात्र यावेळी ही संख्या कमी झाली आहे. ही घट येथील हिंदूंच्या स्थितीमुळे झाली असल्याचे बोलले जात आहे.
बांगलादेश सरकारच्या या फरमानानंतर भारतात विरोध सुरू झाला आहे. कोलकात्यातील इस्कॉनचे उपाध्यक्ष तथा प्रवक्ता राधारमण दास यांनी या आदेशाला विरोध केला आहे. एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, "बांगलादेशच्या गृहमंत्र्यांचे सल्लागार आदेश देत आहेत की, हिंदूंनी अजानच्या 5 मिनिटे आधी त्यांची पूजा, संगीत आणि कोणतेही विधी थांबवावेत अन्यथा अटकेस सामोरे जावे लागेल. हा नवीन तालिबान बांगलादेश आहे."