वॉशिंग्टन, दि. 13 - आपलं प्रेम एखाद्यासमोर व्यक्त करताना तो क्षण आठवणीत राहावा यासाठी प्रत्येकजण काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या पुढील आयुष्यातील वाटचालीचा साक्षीदार असणारा हा क्षण कायमस्वरुपी आठवणीत राहावा यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो. अशा हटके गोष्टी करणारे अनेक अवलिया आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत असतात. पण कधी कधी काहीतरी वेगळं करणं महाग पडण्याचीही शक्यता असते. अमेरिकेतील कॅनजस शहरात राहणा-या सेथ डिक्सन नावाच्या व्यक्तीसोबत असंच काहीसं झालं आहे.
सेथ डिक्सन यांना आपली गर्लफ्रेंड रुथ सलासला लग्नासाठी प्रपोज करायचं होतं. आपल्या आयुष्यातील हा मोलाचा क्षण इतर दिवसांप्रमाणे साधा नसावा यासाठी सेथ डिक्सनने पूर्ण तयारी केली होती. सेथ डिक्सन यांनी प्रपोज करण्यासाठी 3000 डॉलर म्हणजे जवळपास दोन लाख रुपयांची डायमंड रिंग खरेदी केली होती. प्रपोज करण्यासाठी सेथ डिक्सनने नदीवर बनवण्यात आलेला पूल निवडला होता.
सर्व काही ठरलेल्या प्लाननुसार चाललं होतं. जसजशी प्रपोज करण्याची वेळ जवळ येत होती तसंतसं सेथ डिक्सन यांची भीती वाढत होती. शेवटी इतक्या प्रेमाने खऱेदी केलेली ती रिंग देण्याची वेळ आली. पण त्यावेळी असं काही झालं ज्याचा सेथ डिक्सन यांनी विचारही केला नव्हता. झालं असं की रिंग देण्यासाठी म्हणून सेथ डिक्सन यांनी जेव्हा बॉक्स उघडला तेव्हा बॉक्स त्यांच्या हातातून निसटला आणि ती दोन लाखांची रिंग थेट नदीत जाऊन पडली.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, त्यावेळी सेथ डिक्सन यांचे मित्रही त्याठिकाणी उपस्थित होते. जेव्हा रिंग नदीत पडल्याचं मित्रांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी लगेच नदीत उड्या मारुन रिंग शोधण्यास सुरुवात केली. मात्र त्यांना यश मिळालं नाही. उबरमध्ये काम करणारे सेथ डिक्सन गेल्या चार वर्षांपासून रुथ सलासला यांना डेट करत होते. भलेही दोन लाखांचं नुकसान झालं असावं, पण हा दिवस आणि हा क्षण सेथ डिक्सन यांना कायम आठवणीत राहिल याबाबत काही दुमत नाही.
हा क्षण जपून ठेवण्यासाठी सेथ डिक्सन यांनी व्हिडीओही शूट करायला सांगितलं होतं. पण हा व्हिडीओ आपली भलतीच आठवण जपून ठेवेल याची कल्पना सेथ डिक्सन यांना नव्हती.