दक्षिण मेक्सिकोमधील सॅन पेड्रो हुमेलुला हे एक छोटंसं शहर. तिथे लग्नसमारंभाची जय्यत तयारी सुरू आहे. लोक जमलेले आहेत. धुमधडाक्यात नाच-गाणी सुरू आहेत. सगळे जण आनंदी, उत्साही आहेत. नवरदेव आहे तिथले महापौर व्हिक्टर ह्युगो सोसा. आता महापौराचं, म्हणजे शहराच्या प्रथम नागरिकाचंच लग्न म्हटल्यावर सगळा तामझाम आणि लग्नाचा डामडौल आलाच. इतर पुढारीही या लग्नाला आवर्जून हजर आहेत. नवरीही नटूनथटून तयार आहे. तीही साधीसुधी नाही. नखशिखांत सजलेली नवरी तर थेट 'राजकुमारी' आहे. तिचं नाव आहे ॲलिशिया ॲड्रिआना. नवरीनं हिरवा स्कर्ट घातला आहे. हातानं भरतकाम केलेला अंगरखा परिधान केला आहे.
डोक्याला रंगीबेरंगी रिबन लावली आहे. चॉटल जमातीचे लोक या शहरात प्रामुख्यानं राहतात. त्यामुळे इथल्या महापौराला चोंटलच्या राजाचं प्रतीक मानलं जातं. या लोकांची आणखी एक प्रथा आहे. महापैराचं लग्न असलं की नव्या नवरीची ओळख सगळ्या शहराला व्हावी, त्यांची आणि राजकुमारीची जानपहचान वाढावी म्हणून नवी नवरी शहरातल्या प्रत्येक घरी भेट देते. लोकही तिचं कौतुक, आदर सत्कार करतात. लग्नामुळे महापौर अत्यंत आनंदात आहेत. खुशीत येऊन आपल्या होणाऱ्या बायकोबरोबर ते पारंपरिक नृत्यही करतात. हे लव्ह मॅरेज असल्यामुळे नवरीला कुठे ठेऊ आणि कुठे नको असं त्यांना झालं आहे. ते म्हणतात, जोडीदार आपल्या आवडीचा, परिचयाचा असणं आणि विशेष म्हणजे दोघांचंही एकमेकांवर प्रेम असणं अतिशय महत्त्वाचं. त्याशिवाय तुमचं लग्न होऊच शकत नाही. एका अर्थानं हे महापौर महाशय लव्ह मॅरेजचे खंदे पुरस्कर्ते. पत्नीला आयुष्यभर सुखी ठेवणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते प्राणपणानं पाळीन, असं सांगताना राजकुमारीच्या कपाळाचं ते पुन्हा एकदा हळुवार चुंबन घेतात. लग्नाचा मुहूर्त आता एकदम जवळ आल्यानं नवरा- नवरी पुन्हा आपापले ड्रेस बदलतात. पारंपरिक पेहरावातला नवरा आता अधिक रुबाबदार आणि वधूचा पांढराशुभ्र झगा घातलेली राजकुमारी आणखीच शालीन आणि सुंदर दिसते आहे. नवरदेव अतिशय प्रेमानं राजकुमारीला स्वतःच्या हातांनी उचलून लग्नमंडपात घेऊन येतो. बरोबर मुहूर्ताला टाळी लागते. सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट होतो. लोक नव्या जोडप्याला शुभेच्छा देतात आणि जेवणाच्या पंगतीसाठी रांगा लागतात.
प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, या लग्नातही हेच प्रामुख्यानं दिसून आलं. कारण महापौर पूर्वी काही दिवस नैराश्यात होते. त्यांच्या पूर्वीच्या प्रेयसीनं त्यांना 'धोका' दिला होता. प्रेमाच्या आणाभाका घेऊन ऐनवेळी नकार दिला होता. त्यामुळे प्रेम, डेटिंग अशा गोष्टींवरचा त्यांचा विश्वास उडाला होता. आपल्यासाठी नव्या जोडीदाराचा शोधही त्यांनी थांबवला होता. आता कधीच लग्न करायचं नाही, अशा निर्णयाप्रत ते आले होते, पण कालांतरानं राजकुमारीवर त्यांचं प्रेम बसलं आणि लग्न करीन तर हिच्याशीच अशी भीष्मप्रतिज्ञा त्यांनी केली अन् ती प्रत्यक्षातही आणली !
पारंपरिक रीतीरिवाजानुसार धुमधडाक्यात दोघांचं लग्न तर झालं, पण या लग्नात एक अतिशय विचित्र गोष्टही दिसून आली. लग्नाच्या तयारीपासून तर लग्न होईपर्यंत नवरीचं तोंड दोरीनं घट्ट बांधलेलं होतं. पण का असं? तर तशी परंपरा आहे म्हणून! पण अशी इतकी विचित्र परंपरा तरी का म्हणून? कारण इतक्या आनंदाच्या प्रसंगी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून तुम्ही म्हणाल, नवरीपासून लोकांना असा कोणता धोका असणार आहे? का म्हणून तिचं तोंड बांधायचं? इतकं अघोरी, अमानवी कृत्य कशासाठी करायचं? - तर महापौरांनी जिच्याबरोबर लग्न केलं ती राजकुमारी खरंतर एक मगर आहे! त्यामुळेच तिचं तोंड बांधण्यात आलं होतं. या समाजात मगरीला राजकुमारी मानलं जातं आणि महापौरांनी 'राजकुमारी'शी लग्न करणं म्हणजे राजा आणि प्रजा दोघांसाठीही सुख-समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. गेल्या जवळपास तीनशे वर्षांपासून या परीसरात ही प्रथा पाळली जाते. या राजकुमारीबरोबर लग्न केलं तर सारी इडा-पिडा टळते, प्रजा सुखी-समाधानी, आनंदी राहते, काही संकटं आलीच तर या पवित्र विवाहामुळे ती आपोआपच टाळली जातात, अशी या लोकांची श्रद्धा आहे.
'या' विवाहानं सुख-समृद्धी! 'राजा' आणि राजकुमारीच्या या विवाहामुळे केवळ स्थानिक प्रदेशातच सुख-समृद्धी नांदते असं नाही, तर संपूर्ण पृथ्वीचंच त्यामुळे कल्याण होतं आणि अख्ख्या जगावरच इश्वराची छत्रछाया धरली जाते अशी मान्यता इथे आहे. त्यामुळे जगातील इतर काही प्रांतामध्येही मगरीबरोबरचा विवाह अतिशय पवित्र मानला जातो आणि परंपरागत पद्धतीनं शेकडो, हजारो लोकांच्या साक्षीनं हा विवाह समारंभ पार पाडला जातो!