हॅम्बर्गः तिरस्काराला तिरस्कारानेच प्रत्युत्तर देणं म्हणजे मूर्खपणा आहे. भारतीय या शब्दाचा अर्थ अहिंसक असा होतो. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेऊन मी तिरस्काराला प्रेमानं उत्तर दिलं, असं स्पष्ट करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारला चिमटा काढला.
नरेंद्र मोदी यांना मिठी मारण्याचा प्रकार काँग्रेस पक्षातीलही काही सदस्यांना रुचला - पटला नसल्याचं राहुल यांनी सांगितलं. परंतु, मी त्यांच्याशी सहमत नाही. कारण अहिंसा हे भारताचं प्रतीक आहे आणि भारतीयत्वाचं सार आहे. पंतप्रधान मोदी माझ्याबद्दल द्वेष पसवणारी टीका करत आहेत. मी त्यांच्याबद्दल स्नेह दाखवला. हे जग द्वेषाने नाही, तर प्रेमाने चालतं, हे सांगण्याचा प्रयत्न केला, असा टोला त्यांनी लगावला.
जर्मनीतील हॅम्बर्ग इथल्या बुसेरियस समर स्कूलमधील विद्यार्थ्यांशी राहुल गांधींनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला. नोटाबंदी आणि जीएसटीद्वारे मोदी सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेचं वाट्टोळं केलं, असा हल्ला त्यांनी चढवला.
* काय म्हणाले राहुल गांधी...
>> १९९१ मध्ये दहशतवाद्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली होती. जेव्हा मी या मारेकऱ्याला मृतावस्थेत पाहिलं, तेव्हा मला वाईट वाटलं. त्याचा रडणारा मुलगा माझ्या नजरेसमोर आला.
>> हिंसा किती भीषण आहे, हे मी अनुभवलं आहे. त्यातून बाहेर येण्याचा एकमात्र उपाय आहे, तो म्हणजे माफ करणं.
>> नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेऊन मी द्वेषाचं उत्तर प्रेमाने दिलं आहे. संपूर्ण जगानेच द्वेषाऐवजी चर्चा करण्याची गरज आहे.
>> तुम्ही जर जनतेची गळाभेट घेऊन त्यांना एक विचार - एक दृष्टी दिली नाहीत, तर दुसरं कुणीतरी देईल आणि कदाचित हा विचार तुम्हाला पटणारा नसेल. दुसरे काय म्हणताहेत, हे तुम्हाला ऐकावं लागेल.
>> मी एखाद्या व्यक्तीशी लढू शकतो, त्याच्याशी मतभेद होऊ शकतात, पण द्वेष ही धोकादायक गोष्ट आहे.
>> दलित, अल्पसंख्याक आणि आदिवासींना आता सरकारकडून कुठलीही मदत मिळत नाहीए. त्यांच्या फायद्याच्या सर्व योजनांचा निधी मोजक्या कॉर्पोरेट कंपन्यांना मिळत आहे.
No Confidence Motion: ...अन् राहुल गांधींनी भर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठीच मारली!