बीजिंग : जगभरात अनेक रहस्यमय, आश्चर्यकारक गोष्टी आहेत. हजारो वर्षांनंतर समोर येणाऱ्या अनेक गोष्टी मानवी बुद्धीला थक्क करतात. चीनमध्ये पुरातत्त्व शास्त्रज्ञांना नुकत्याच सापडलेल्या १५०० वर्षांपूर्वीच्या दोन मानवी सांगाड्यांनीही असाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. स्त्री-पुरुषाचे हे प्राचीन सांगाडे अमर प्रेमाची कथा सांगत असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
उत्तर चीनमध्ये शांजी प्रांतात एका बांधकामादरम्यान खोदाव्या लागलेल्या स्मशानभूमीत १५०० वर्षे जुने दोन सांगाडे सापडले. त्यात एक स्त्री आणि एक पुरुष असून, ते आलिंगन दिलेल्या स्थितीत आहेत. हीच अतिशय वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. पुरुष आणि स्त्रियांना एकत्र दफन करणे आणि तेही आलिंगन दिलेल्या रूपात, ही सामान्य बाब नाही, असे शास्त्रज्ञ म्हणतात.
चीनमध्ये प्रथमच असे सांगाडे आढळले असून त्यांनी त्या काळातल्या प्रेमाची विचारसरणी दर्शविली आहे. पुरातत्त्वशास्त्रात क्वचितच असे अमर प्रेमाचे उदाहरण आढळले आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले. त्या दोघांना उत्तर व्ही राजवटीच्या दरम्यान इसवी सन ३८६ ते ५३४ दरम्यान दफन करण्यात आले असावे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. जून महिन्यात प्रकाशित झालेल्या इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑस्टियोआर्किओलॉजीच्या अंकात या सांगाड्यांबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
यातील पुरुषाचा सांगाडा सुमारे ५ फूट ४ इंच उंचीचा असून, तो २९ ते ३५ वर्षे वयाच्या दरम्यान मरण पावला असावा. त्याच्या हाताचे हाड मोडले असून, उजव्या हाताचे एक बोट गायब होते आणि उजव्या पायाचे हाडही तुटलेले होते.
प्रेम टिकवून ठेवण्यासाठीमहिलेचे वय ३५ ते ४० वर्षांच्या दरम्यान असून, तिची उंची ५ फूट २ इंच आहे. त्या पुरुषाच्या मृत्यूनंतर, तिनेही आपला जीव दिला असावा. मृत्यूनंतर दुसऱ्या जगात प्रेम टिकवून ठेवण्यासाठी, या पती-पत्नीने असा निर्णय घेतला असावा, जेणेकरून ते पुढील आयुष्यातही एकत्र राहतील, असा कयास बांधला जात आहे.