इंडोनेशियामध्ये 6.2 तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. सुलावेसी बेटावर झालेल्या या भूकंपामध्ये आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला असून 700 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. रात्री 1.28 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा पहिला मोठा धक्का जाणवला. सध्या मदतकार्य सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इंडोनेशियाची न्यूज एजन्सी बीएनपीबीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे गव्हर्नर कार्यालय, हॉटेल्स, घरं आणि स्थानिक आरोग्य केंद्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
जवळपास 15 हजार लोकांनी भूकंपामुळे आपलं राहतं घर सोडलं आहे. तसेच काही लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. भूकंपामुळे काही परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच टेलिफोन नेटवर्कचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भूकंपामध्ये एका मोठ्या रुग्णालयाची इमारत कोसळली असून त्याखाली अनेक रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांचा मृत्यू झाला आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काही दिवसांपूर्वी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण केल्यानंतर एक विमान बेपत्ता झाल्याची घटना समोर आली होती. उड्डाणानंतर अवघ्या 4 मिनिटांत 62 प्रवासी असलेलं विमान बेपत्ता झालं असून सर्च ऑपरेशन सुरू होतं. रिपोर्टनुसार, श्रीविजय एअरचे 182 हे विमान एकूण 62 प्रवाशांना घेऊन निघाले होते. इंडोनेशियातील सोशल मीडियावर याबाबतचे काही फोटो जोरदार व्हायरल झाले होते. फ्लाइट रेडार 24 अनुसार, (FlightRadar24) हे विमान तब्बल 26 वर्षे जुन्या बोइंग 737-500 साखळीतील होतं. या विमानाने शनिवारी संध्याकाळी जकार्ताच्या सोकार्नो-हट्टा विमानतळावरून उड्डाण केले होतं. मात्र उड्डाणानंतर अवघ्या चार मिनिटानंतर या विमानाचा संपर्क तुटला.