मुलांच्या डब्याला काय द्यायचं, हा जगभरातील आयांना पडणारा अवघड प्रश्न. मुलं दिवसातील कमीतकमी ५ ते ६ तास शाळेत असतात. दिवसभरातल्या एकूण खाण्यापैकी महत्त्वाचं खाणं त्यांचं शाळेच्या वेळेत होत असतं. त्यामुळे शाळेचा डबा हा मुलांच्या जिभेला कसा आवडेल आणि त्यांच्या आरोग्याला कसा फायदेशीर ठरेल यासाठीची तारेवरची कसरत आयांना करावी लागते. सकाळी धावपळ करून तयार केलेला डबा जर मुलांनी खाल्ला नाही, उष्टा टाकला तर आया चिडतात, रागावतात, आपल्या मुलांना आपण केलेलं आवडलं नाही, त्यांचं पोट भरलं नाही म्हणून दुखावतात. शाळेच्या डब्याला अशी संवेदनशील पार्श्वभूमी असताना या डब्यालाच जर कोणी टीकेचं लक्ष्य केलं आणि ते जर आयांपर्यंत पोहोचलं तर आयांचा किती संताप होतो याचं उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकेतल्या कॅरोलिनचं द्यायला हवं. समाजमाध्यमावर व्हायरल झालेली कॅरोलिनची पोस्ट सध्या जगभरात चर्चेचा विषय झाली आहे. शिक्षकांचं सांगणं चुकीचं की कॅरोलिनाची भूमिका बरोबर? यावर लोकांमध्ये वाद झडत आहेत. अनेक शिक्षकांना कॅरोलिनने घेतलेली भूमिका आततायी वाटते, तर मुलांच्या शाळेच्या डब्यावर रोज स्वत:चं डोकं लढवणाऱ्या पालकांना कॅरोलिनने आपल्या मुलीच्या शिक्षकांना दिलेली प्रतिक्रिया योग्य वाटते. पण, हा वाद होण्यामागे झालं तरी काय?
कॅरोलिन ही अमेरिकेतील एक उद्योजक महिला. लहान मुलांसाठीची भांडी विकण्याचा तिचा व्यवसाय. ती ‘पेझ्झी’ नावाची एक कंपनी चालवते. कॅरोलिनला इव्हलिन ही तीन वर्षांची मुलगी आहे. इव्हलिन नर्सरीत जाते. एकदा इव्हलिन शाळेतून घरी आली आणि नेहमीप्रमाणे शाळेत काय झालं, हे आपल्या आईला सांगू लागली. सांगता सांगता टीचर डब्याबद्दल काय बोलल्या हेही तिने आईला सांगितलं. ते ऐकून कॅरोलिनचा संताप झाला. कॅरोलिनने त्या दिवशी इव्हलिनला डब्यात सँडविच, कूकी आणि काकडीचे सलाड दिले होते. सँडविच आणि सलाड सोडून आधी कूकी खाणाऱ्या इव्हलिनला तिच्या टीचरने टोकलं. ‘आधी गूड फूड खावं आणि नंतर कूकीसारखं बॅड फूड खावं असं सांगितलं. टीचरच्या टोकण्याने खाण्याची लय बिघडलेल्या इव्हलिनने हे सर्व आपल्या आईला सांगितलं. शिक्षक खाण्याच्या पदार्थांमध्ये गूड आणि बॅड असा फरक कसा करू शकतात, असा प्रश्न कॅरोलिनला पडला. तिला हा मुद्दा अतिशय गंभीर वाटला.
मुळात इव्हलिनच्या खाण्या-पिण्याच्या बाबतीत आपण इतका विचार करतो, डाॅक्टर, आहारतज्ज्ञ काय सांगतात, अनुभवी आया काय सांगतात हे शोधून, त्याचा अभ्यास करून आपण इव्हलिनचा डबा तयार करतो, प्रयत्नपूर्वक डब्यात वैविध्य आणतो आणि आपल्या या सर्व प्रयत्नांवर शाळेतले शिक्षक मात्र मुलांना त्यांनी कोणत्या क्रमाने काय खावं हे सांगणार, मुलांच्या मनात गूड फूड-बॅड फूडचा पूर्वग्रह निर्माण करणं चुकीचं आहे, असं कॅरोलिनचं ठाम मत होतं. जे वय मुलांनी सर्व चवी चाखून बघण्याचं , वेगवेगळे पदार्थ खाऊन बघण्याचं असताना शिक्षकच जर मुलांच्या या अनुभवाला आडकाठी आणणार असतील तर मुलं खाण्याच्या अनुभवाला मोकळेपणाने सामोरे कसं जातील, अशी चिंता कॅरोलिनला वाटली. त्यामुळे टीचर अशा कशा म्हणाल्या यावर नुसतं मनातल्या मनात धुसफुसत राहण्यापेक्षा आपण इव्हलिनच्या शिक्षकांना सडेतोड प्रतिक्रिया द्यायला हवी असं तिला वाटलं. तिने इव्हलिनचा डबा भरला. डब्यात सँडविच, संत्री आणि कूकी भरून डबा बंद केला. तो दप्तरात भरण्याआधी इव्हलिनच्या शिक्षिकेसाठी एक चिठ्ठी चिकटवली. त्या चिठ्ठीत कॅरोलिनने लिहिलं, ‘आम्ही इव्हलिनला तिला वाटेल आणि आवडेल त्या क्रमाने डब्यातले पदार्थ खाण्याची परवानगी दिली आहे. डब्यातले पदार्थ हे फक्त पदार्थच आहेत. यात गूड आणि बॅड फूड असं काही नाही.’
इव्हलिन नेहमीप्रमाणे दप्तर उचलून शाळेत गेली. पुढे शाळेत या चिठ्ठीवरून काय झालं, चिठ्ठी वाचून टीचरची काय प्रतिक्रिया होती हे माहीत नाही. पण, डब्याला चिकटवलेल्या चिठ्ठीचा कॅरोलिनने फोटो काढून तो फोटो समाजमाध्यमावर शेअर केला आणि एका गंभीर चर्चेला सुरुवात झाली. कोण चूक, कोण बरोबर याचा निवाडा सुरू झाला.
कॅरोलिन म्हणते, मला अधिकार आहे!कॅरोलिन म्हणते, मुलगी तीन वर्षांची असली तरी पौष्टिक खाण्यावर आपण तिच्याशी सतत बोलत असतो. एकच एक पदार्थ खाऊन आपल्या शरीराला हवं ते मिळत नाही, मग कोणता पदार्थ किती खायला हवा हेही आपण तिला जाणीवपूर्वक सांगतो. पण, हे सांगत असताना त्या पदार्थांविषयी तिच्या मनात पूर्वग्रह निर्माण होणार नाही याची काळजीही घेतो. त्यामुळे पदार्थांमध्ये गूड -बॅडचा चुकीचा फरक करणाऱ्या शिक्षकांना प्रतिक्रिया देण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे.