इस्रायलमध्ये हमासकडून हल्ले सुरु आहेत. यामुळे फिलिस्तीन आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु झाले असून आणखी काही देश यामध्ये उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असताना हमासच्या हल्ल्यात दोन भारतीय महिला सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यापैकी एक महिला ही महाराष्ट्रातील असल्याचे सांगितले जात आहे.
७ ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यावेळी या दोन्ही महिला दक्षिणी इस्रायलमध्ये तैनात होत्या. इस्रायलमध्ये प्रत्येक नागरिकाला सैन्यात जावे लागते. पुरुषांसाठी ३६ महिने आणि महिलांसाठी २४ महिने ही सक्तीची सेवा आहे. इस्रायलचे नागरिकत्व घेतलेल्या परदेशी नागरिकांनाही ही सक्ती आहे. यामुळे भारतीय वंशाच्या या तरुणी देखील सैन्यात सहभागी झाल्या होत्या.
या दोन महिलांच्या वीरमरणाबाबत इस्रायल सैन्य आणि भारतीय समाजाने देखील पुष्टी केली आहे. यामध्ये २२ वर्षांची लेफ्टनंट ऑर मोझेस आणि इंस्पेक्टर किम डोक्राकर यांचा समावेश आहे. यापैकी डोक्राकर ही महाराष्ट्रीयन असल्याचे सांगितले जात आहे. किम डोक्राकर ही बॉर्डर पोलीस कार्यालयात तैनात होती. हमासच्या दहशतवाद्यांनी हे पोलिस ठाणे देखील लक्ष्य बनविले होते.
हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत २८६ सैनिक आणि ५१ पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या भारतीय समुदायाचे म्हणणे आहे की भारतीय वंशाच्या मृत लोकांची संख्या वाढू शकते, कारण आत्तापर्यंत इस्रायलमधील अनेक लोकांचे हमासने अपहरण केले आहे, त्यापैकी काहींची अद्याप ओळख पटलेली नाही.