क्वालालंपूर- महाथिर महंमद यांना मलेशियाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली आहे. ९२ वर्षांचे महाथिर पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून निवडले गेले आहेत. जगातील लोकशाही मार्गाने निवडून आलेले सर्वात वयोवृद्ध नेते म्हणून ते ओळखले जातील. महाथिर यांनी २२२ पैकी ११३ जागांवर विजय मिळवला आहे. यापुर्वी त्यांनी २२ वर्षे मलेशियाची सत्ता सांभाळली होती. मात्र २००३ साली त्यांच्या पक्षाचा पराभव झाल्यावर त्यांना पायउतार व्हावे लागले होते.
मलेशियाचे मावळते पंतप्रधान नजीब रजाक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. १ एमडीबी योजनेतून त्यांनी कोट्यवधी रुपये लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नजीब यांच्या बँरिसन नँशनल आघाडीला केवळ ७९ जागा मिळाल्या आहेत. ही आघाडी मलेशियात प्रदीर्घकाळ सत्तेत होती. महाथिर यांच्या विजयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सत्तेत येण्यासाठी त्यांनी तुरुंगवास भोगलेल्या अन्वर इब्राहिम यांच्याशी हातमिळवणी केली आहे.
सत्तेत पुन्हा येत असल्याचे स्पष्ट होताच महाथिर यांनी पत्रकार परिषद घेऊन, होय मी जिवंत आहे असे सांगत आपले नव्या सरकारबाबतचे मत मांडले. नजीब यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करु, आपण सूड घेणार नाही मात्र कायद्याचे राज्य स्थापन होण्यासाठी प्रयत्न करु असेही ते म्हणाले.
नजीब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तसेच महाथिर यांच्यावर ते एकाधिकारशाहीच्या विचारांचे आहेत असा आरोप होतो. निवडणूक निकालानंतर मलेशियाचे चलन रिंगिटचा भाव डाँलरच्या तुलनेत घसरला आहे.