प्रवाशांना स्पेनला घेऊन जात असलेली बोट मोरोक्कोजवळ उलटल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 40 हून अधिक पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. स्थलांतरित हक्क गट ‘वॉकिंग बॉर्डर्स’ने दिलेल्या माहितीनुसार, 50 हून अधिक प्रवासी बुडाल्याची शक्यता आहे. या बोटीत एकूण 80 प्रवासी होते, असे समजते.
मोरोक्कोच्या अधिकाऱ्यांनी एक दिवस आधी एका बोटीवरून 36 जणांना वाचवले होते. ही बोट दोन जानेवारीला मॉरिटेनिया येथून 86 प्रवाशांना घेऊन निघाली होती. यांत 66 पाकिस्तानी प्रवाशांचा समावेश होता. दरम्यान, ‘वॉकिंग बॉर्डर्स’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हेलेना मालेनो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर म्हटले आहे की, बुडणाऱ्यांमध्ये 44 जण पाकिस्तानी आहेत.
यासंदर्भात पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे. यात, आपला दुतावार बचाव कार्यात मदत करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. याशिवाय, पाकिस्तानी दूतावासाकडून एका टीमला पाकिस्तानी नागरिकांच्या मदतीसाठी दखला येथे पाठवण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे की, “रबात (मोरोक्को) येथील आमच्या दूतावासाने कळवले आहे की, मॉरिटानिया येथून पाकिस्तानी नागरिकांसह 80 प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट, दखला बंदराजवळ उलटली. या अपघातात बचावलेल्या अनेक पाकिस्तानी नागरिकांना आणि इतरही काही लोकांना दखलाजवळ एक शिबिरात ठेवण्यात आले आहे. आम्ही लवकरात लवकर मदत पोहोचवत आहोत."