लंडन : लंडनच्या वेळेनुसार रविवारी रात्री ११ वाजता म्हणजेच भारताच्या वेळेनुसार सोमवारी पहाटे ४ वाजता एक महाकाय लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे. अॅस्टरॉईड यूडब्लू- १५८ असे या लघुग्रहाचे नाव असून, त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ९० दशलक्ष टन वजन असणाऱ्या या लघुग्रहात ५० अब्ज डॉलर किमतीचे प्लॅटिनम असेल. पृथ्वीच्या सर्वात जवळ असणाऱ्या ग्रहापेक्षा ३० पटीने तो पृथ्वीच्या जवळ येणार आहे. स्लूह नावाचे एक उपकरण दुर्बिण इंटरनेटशी जोडते. आफ्रिकेच्या नैऋत्येला असणाऱ्या कॅनरी बेटावरील प्रयोगशाळेत या दुर्बिणीच्या साहाय्याने घेतलेली छायाचित्रे दाखविली जाणार आहेत. यूडब्लू -१५८ लघुग्रह पृथ्वीजवळून जाईल तेव्हाचे थेट चित्रण स्लूहकडून केले जाईल. स्लूहचे शास्त्रज्ञ बॉब बर्मन यांनी ही माहिती दिली. या लघुग्रहावर प्लॅटिनमचा मोठा साठा आहे, कधीतरी त्याचे उत्खननही केले जाईल. असे लघुग्रह एक्स टाईप श्रेणीत दाखल केले जातात. प्लॅनेटरी रिसोर्सेस ही कंपनी लघुग्रहांच्या उत्खननाचा विचार करीत आहे. (वृत्तसंस्था)
पृथ्वीजवळून जाणार महाकाय लघुग्रह
By admin | Published: July 19, 2015 11:52 PM