Sweden school shooting 2025: स्वीडनमधील सेंट्रल ओरेब्रो शहरात असलेल्या एका शैक्षणिक केंद्रामध्ये भयंकर घटना घडली. मंगळवारी (४ फेब्रुवारी) दुपारी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. दुपारी १ वाजेच्या सुमारास करण्यात आलेल्या या हल्ल्यात १० लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा वाढवली. शैक्षणिक केंद्राच्या परिसरात न जाण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
या भयंकर हल्ल्याने सेंट्रल ओरब्रो शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सेंट्रल ओरबो शहरातील पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेचा प्राथमिक तपास करण्यात आला आहे. हत्येचा प्रयत्न आणि गंभीर हल्ला म्हणून या घटनेचा तपास केला जात आहे. हल्ला का करण्यात आला आणि हल्ल्यात कोण कोण मारले गेले, याबद्दल अद्याप जास्त माहिती नाहीये.
स्वीडनचे कायदा मंत्री गुन्नार स्ट्रोमर यांनी स्वीडनमधील माध्यमांशी बोलताना सांगितले की, "ओरब्रोमध्ये झालेली घटना गंभीर आहे. पोलीस घटनास्थळी आहेत आणि कारवाई केली जात आहे. सरकार केंद्रीय यंत्रणाच्याही संपर्कात आहे. परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत."