कंधार:अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य परत गेल्यानंतर अफगाणिस्तान आणि तालिबानमधील संघर्ष वाढला आहे. दरम्यान एका हल्ल्यात अफगाण सैन्यानं तालिबानचे जवळपास 300 दहशतवादी मारल्याचा दावा अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने केलाय. अफगाण सैन्यानं विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत तालिबानचे शेकडो दहसतवादी ठार झाले असून, अनेकजण जखमी झालेत, अशी माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
संरक्षण मंत्रालयाने रविवारी केलेल्या ट्विटनुसार, रविवारी गजनी, कंधार, हेरात, फराह, जोजजान, बल्ख, समांगन, हेलमंद, तखर, कुंदुज, बगलान, काबुल आणि कपिसा राज्यात अफगाणिस्तानच्या सैन्याने मोठ्या कारवाईत 300 पेक्षा जास्त तालिबानी दहशतवाद्यांना ठार केले तर 97 पेक्षा जास्त जखमी झाले.
मागील अनेक वर्षांपासून अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्थानात असल्यामुळे वातावरण शांत होतं. पण, अमेरकन सैन्य निघून जाताच देशात हिंसा झपाट्याने वाढली. तालिबानने अफगाणिस्तानच्या जवळपास 80-85 टक्के भागावर ताबा मिळवल्याचा दावा करण्यात येतोय. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितल्यानुसार, तालिबानने 193 जिल्हा केंद्र आणि 19 सीमावर्ती जिल्ह्यांवर ताबा मिळवला आहे.
तालिबानने तखर, कुंदुज, बदख्शां, हेरात आणि फराह राज्यातील सीमेपलीकडेजाऊ शकणाऱ्या 10 ठिकाणांवर ताबा मिळवला आहे. यामुळे व्यापारावरही मोठा परिणाम झालाय. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने सांगितल्यानुसार 14 एप्रिलपासून आतापर्यंत तालिबानने 4,000 अफगाणी सैनिकांना मारले असून, 7,000 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. तर 1,600 जणांना तालिबानने पकडून नेले आहे. सैनिकांशिवाय, हिंसेत 2,000 पेक्षा अधिक सामान्य नागरिकांचा मृत्यू झालाय. यात महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.