नवी दिल्ली, दि. 21 - सातत्याने युद्धखोरीची भाषा करणा-या ग्लोबल टाइम्स या वर्तमानपत्राने आता चिनी लष्कराने अज्ञातस्थळी जोरदार युद्ध सराव केल्याचे वृत्त दिले आहे. डोकलाम संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा युद्ध सराव होत असल्याकडेही ग्लोबल टाइम्सने लक्ष वेधले आहे. पिपल्स लिबरेशन आर्मी म्हणजेच चिनी लष्कराच्या पश्चिमी कमांडच्या 10 तुकडयांनी या युद्ध सरावात भाग घेतला होता. भारतीय सीमेला लागून असलेल्या तिबेटमधील चिनी लष्कराच्या तुकडयांचा पश्चिमी कमांडमध्ये समावेश होतो. युद्धसरावाचा व्हिडीओ प्रसारीत करणे हा भारतावर जरब, धाक बसवण्याच्या रणनितीचा एक भाग आहे.
चीनची सेंट्रल टेलिव्हिजन वाहिनी आणि ग्लोबल टाइम्स ही दोन्ही प्रसारमाध्यमे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीची मुखपत्रे समजली जातात. चीनकडून प्रसारीत करण्यात आलेल्या पाच मिनिटांच्या व्हीडिओमध्ये रणगाडे टेकडयांच्या दिशेने तोफगोळयांचा वर्षाव करत आहेत तर, क्षेपणास्त्रांनी सज्ज हेलिकॉप्टर्स जमिनीवरील टार्गेटसना लक्ष्य करताना दिसत आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात चीनच्या सेंट्रल टेलिव्हिजनकडून हा व्हीडीओ प्रसारीत करण्यात आला. तिबेटमधील अज्ञातस्थळी हा युद्ध सराव सुरु असल्याचे वाहिनीकडून सांगण्यात आले होते.
16 जूनला चीनने भूतानच्या हद्दीत येणा-या डोकलाममध्ये घुसखोरी करुन रस्ता बांधणीचा प्रयत्न केला तेव्हापासून हा संघर्ष सुरु झाला आहे.डोकलाममध्ये चीनने रस्ता बांधल्यास भारताच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होईल त्यामुळे भारताने इथे चीनला रस्ता बांधणीपासून रोखले. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये संघर्ष निर्माण झाला असून, डोकलाममध्ये दोन्ही देशांचे सैन्य परस्परासमोर उभे ठाकण्याच्या घटनेला आता 50 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत.
भारताला पाठिंबा देऊन जपानची चीनला सणसणीत चपराकडोकलाम मुद्यावरुन भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या संघर्षात जपान भारताच्या बाजूने उभा राहिला आहे. जपानने भारताला पाठिंबा देताना कुठल्याही देशाने जबरदस्ती, दडपशाहीच्या मार्गाने डोकलाममधील जैसे थे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करु नये असे म्हटले आहे. जापानने जाहीरपणे पाठिंबा देण्याची घेतलेली भूमिका म्हणजे चीनसाठी सणसणीत चपराक आहे. कोणीही जबरदस्तीने जैसे थे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करु नये. शांततेने तोडगा काढावा असे जपानचे राजदूत कीनजी हिरामाटसू यांनी सांगितले.