ऑनलाइन लोकमत
ओस्लो (नॉर्वे), दि. १० - मलाला युसुफजाई ही माझी पाकिस्तानी मुलगी आहे आणि मी तिचा भारतीय पिता असल्याचे उद्गार मलालासोबत संयुक्त नोबेल पारितोषिक स्वीकारताना कैलाश सत्यार्थी यांनी काढले. ११ लाख डॉलर्सचा अत्यंत मानाचा पुरस्कार स्वीकारताना, जगातल्या प्रत्येक मुलाचा शिक्षणावर, आरोग्यावर, चांगल्या आयुष्यावर अधिकार असल्याचे सत्यार्थी म्हणाले.
जगामध्ये करूणेचा अभाव असून करूणा असलेल्या प्रत्येकानं एकत्र येऊन जगामधला अंध:कार दूर करायला हवा असं आग्रही प्रतिपादन स्तयार्थी यांनी केलं. जगामध्ये लष्करावर होणा-या खर्चापैकी एक आठवड्याचा खर्च लहान मुलांवर खर्च केला तर बालकामागाराचा प्रश्न लगेच सुटेल असं सांगताना सत्यार्थी यांनी जगभरातल्या गरीब व अत्याचारांना बळी पडणा-या मुलांच्या ह्रदयद्रावक स्थितीचं वर्णन केलं आणि प्रत्येकानं आपल्यामध्ये दडलेल्या मुलाला स्मरून या मुलांचं दु:ख हलकं करायला हवं असं आवाहन केलं.
यानंतर युसुफजाई मलालाने केलेल्या भाषणात तीने पालकांचे व शिक्षकांचे आभार मानले. सत्यार्थींसोबत पुरस्कार दिला जात असल्याने मी स्वतःला भाग्यवान समजते असेही मलालाने आपल्या भाषणात म्हटले आहे. पाकिस्तानातील पश्तूनसारख्या मागासलेल्या विभागात दहशतवाद्यांमुळे लोक मुलींना शिक्षणापासून परावृत्त करतअसल्याचे दुःख तीने बोलून दाखवले. त्याचप्रमाणे मलाला राहत असलेल्या गावात माध्यमिक शाळा नसल्याने या पुरस्काराचा निधी माध्यमिक शाळास्थापन करण्यासाठी वापरणार असल्याचेही मलालाने सांगितले. हा पुरस्कार फक्त माझाच नसून दहशतवाद्यांच्या धमक्यांना नजुमानता शाळेत येणा-या माझ्या सर्व मैत्रिणींचा असल्याचे मलालाने सांगितले.
इस्लाममध्ये कधीही कुणाची हत्या करण्यास सांगितले नाही, उलट एका माणसाला मारणे म्हणजे माणुसकीला मारणे असा उल्लेख कुराणात असल्याचे सांगत दहशतवादी इस्लामचा चुकीचा अर्थ लावत असून मानवहानी करत असल्याने मलालाने हळहळ व्यक्त केली. त्याचप्रमाणे जगातील बलाढ्य देश युद्ध करण्यासाठी बंदूका देऊ शकातात पण पुस्तकं का देऊ शकत नाहीत, असा प्रश्न तीने भाषणादरम्यान उपस्थित केला. सर्व मुला- मुलींना शिक्षण मिळावं, मुलांचं शोषण होऊ न देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करत मलालाने भाषणाचा शेवट केला.