ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 9 - नोबेल पुरस्कारप्राप्त मलाला युसूफझाई लवकरच संयुक्त राष्ट्राची शांतीदूत होणार आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी मलाला युसूफझाईची संयुक्त राष्ट्राची शांतिदूत म्हणून निवड केली आहे. संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखाकडून देण्यात येणारा हा सन्मान म्हणजे जगातल्या कोणत्याही व्यक्तीसाठी पुरस्काराइतकाच महत्त्वाचा समजला जातो. मलालानं मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी अतोनात मेहनत आणि काम केलं आहे, असंही संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक म्हणाले आहेत. मलाला युसूफझाईला सोमवारी संयुक्त राष्ट्राच्या एका कार्यक्रमात शांतीदूत म्हणून नियुक्ती करून सन्मानित करण्यात येणार आहे. मलाला युसूफझाई जगातील सर्वांत कमी वयाची नोबेल पुरस्कार विजेती आहे. 19 वर्षांच्या या मुलीने आजपर्यंतचे सर्व आयुष्य दहशतवादाविरोधात लढताना घालवले आहे. तिने तालिबानची बंदी असतानाही मुलींच्या शिक्षणासाठी मोहीम राबवली. पाकिस्तानात ती दुसऱ्या नावाने मुलींच्या शिक्षणासाठी लिहीत असे. 2010 साली तालिबानने स्वात खोऱ्यातील खासगी शाळा बंद केल्या. तरीही मलालाची मोहीम चालूच राहिली. त्यानंतर मलालावर हल्लाही करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर मलाला दहशतीखाली असतानाच संयुक्त राष्ट्रानं शांतीदूत नेमून तिला एक प्रकारे सुरक्षा प्रदान केली आहे. आपले अनुभव कथन केलेल्या तिच्या "आय एम मलाला" या पुस्तकाची प्रचंड विक्री झाली आहे. या पुस्तक विक्रीतून आणि व्याख्यानाच्या मानधनातून मलाला आणि तिचे कुटुंबीय आज करोडपती झाले आहेत. या पुस्तकाच्या आतापर्यंत 18 लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. मलाला युसूफजईला प्रत्येक व्याख्यानासाठी 1 लाख 14 हजार पाऊंड एवढे मानधन मिळते. आय एम मलाला या पुस्तकाच्या आतापर्यंत 18 लाख प्रतींची विक्री झाली आहे. एकट्या ब्रिटनमध्ये 2 लाख 87 हजार प्रती विकल्या गेल्या आहेत.
संयुक्त राष्ट्राची शांतीदूत होणार मलाला युसुफझाई!
By admin | Published: April 09, 2017 8:52 AM