क्वालालंपूर- मलेशियामधील सुप्रसिद्ध हिंदूमंदिर तेथे मोठ्या संख्येने जाणाऱ्या भाविकांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र बाटू केव्ह्जमधील हे मंदिर आता एका वादामध्ये ओढले गेले आहे. हेरिटेज साइट म्हणून ओळख मिळालेल्या मंदिरामुळे मलेशियात एक मोठे पर्यटन केंद्र उभे राहिले आहे. तसेच एका चुनखडकाच्या गुहेमध्ये हे मंदिर आहे. मलेशियामध्ये राजधानी क्वालालंपूरच्या बाहेर एका डोंगरामध्ये ही गुहा आहे. त्यासाठी 272 पायऱ्या चढून जाव्या लागतात. स्थानिक तमिळ लोक व परदेशातून विशेषतः भारतातून जाणारे पर्यटक या मंदिराला आवर्जून भेट देतात. या मंदिरामध्ये दर 12 वर्षांनी उत्सव साजरा होतो. त्यानिमित्ताने या पायऱ्या रंगवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या पायऱ्या अत्यंत भडक आणि वेगवेगळ्या रंगांनी रंगवल्याने बाटू केव्हजच्या सौंदर्याला बाधा पोहोचली आहे असे मत व्यक्त केले जात आहे. मंदिर समितीवर मलेशियन सरकारच्या हेरिटेज विभागाने टीका केली असून आमची परवानगी घ्यायला हवी होती अशी टीप्पणी केली आहे. पायऱ्या रंगविण्यापूर्वी परवानगी न घेतल्याबद्दल मलेशियन सरकारच्या विभागाने नाराजी व्यक्त केली आहे.
भडक रंगात पायऱ्या रंगवणाऱ्या मंदिर प्रशासनावर मलेशिया सरकार संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 1:48 PM