मॉस्को/ किव्ह : अॅमस्टरडॅमहून कुआलालंपूर येथे जाणारे मलेशियन एअरलाइन्सचे विमान गुरुवारी रात्री रशियाच्या सीमेलगत युक्रेनमध्ये कोसळून २८० प्रवासी व १५ विमान कर्मचारी ठार झाल्याचे वृत्त आहे. मात्र हे विमान अपघातामुळे पडले की ते पाडले गेले याविषयी रात्री उशिरापर्यंत उलटसुलट बातम्या येत होत्या. एमएच १७ या उड्डाणावर असलेल्या विमानाशी युक्रेनच्या हवाई हद्दीत संपर्क तुटला आहे व विमानाचे नेमके काय झाले याची माहिती घेतली जात आहे, असे सांगून मलेशियन एअरवेजच्या प्रवक्त्याने हे विमान कोसळले असावे, यास अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला. रशियाच्या सरकारी सूत्रांनी सांगितले की, या विमानाने अपेक्षित वेळी आमच्या हवाई हद्दीत प्रवेश केला नाही. त्याआधीच ते सीमेजवळ युक्रेनच्या हद्दीत कोसळले. मात्र युक्रेनच्या गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने इंटरफॅक्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तावरून या विमानास अपघात झाला नसून ते जमिनीवरून क्षेपणास्त्र सोडून पाडण्यात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे असले तरी प्रवासी विमानावर हा क्षेपणास्त्र हल्ला नेमका कोणी केला हे स्पष्ट झालेले नाही. रशियावरही शंकेची छाया हवेत उडणारे विमान क्षेपणास्त्राने पाडण्यासाठी लागणारी अचूक लष्करी निपुणता या भागात फक्त रशियन सेनादलांकडेच असू शकते याकडे संकेत करत युक्रेनमध्ये या हल्ल्यामागे रशियाही असू शकते, अशी शंका अपरोक्षपणे व्यक्त केली जात होती. (वृत्तसंस्था)
१० हजार मीटर उंचीवरून मलेशियाचे विमान कोसळले; २९५ ठार
By admin | Published: July 18, 2014 3:10 AM