क्वालालंपूर : सुमारे पंधरा महिन्यांपूर्वी दुर्घटनाग्रस्त झालेले मलेशियन एअरलाईन्सचे एमएच- १७ हे विमान रशियाच्या मिसाईलने पाडले होते, असा निष्कर्ष याचा तपास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय तपास दलाने काढला आहे. या विमानातील सर्व २९८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.एका डच दैनिकाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. तपास करणाऱ्या पथकातील तीन सदस्यांच्या हवाल्याने एका दैनिकाने हे वृत्त दिले आहे. यात म्हटले आहे की, जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या बीयूके मिसाईलने हे विमान पाडण्यात आले होते. १७ जुलै २०१४ रोजी हे विमान एम्स्टर्डमहून क्वालालंपूरला जात होते. बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या पूर्व युक्रेनमधून रशियन बनावटीच्या मिसाईलचा मारा करून ते पाडण्यात आले होते.दरम्यान, या अहवालामुळे रशिया आणि पश्चिम भागातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुरक्षा बोर्डाचे अधिकारी १५ महिन्यांच्या तपासानंतर बहुप्रतीक्षित अहवाल देण्यासाठी तयार आहेत, तर रशिया या प्रकरणी उत्तर देण्यासाठी तयार आहे. याबाबत भाष्य करताना विश्लेषक पीटर फेलस्टीड यांनी म्हटले आहे की, आम्ही ज्यांच्यावर संशय घेतला होेता त्या रशियाचीच यात चूक होती हे आता स्पष्ट होत आहे. या तपास दलात नेदरलँडसह आॅस्ट्रेलिया, बेल्जियम, मलेशिया, युक्रेन या देशांच्या सदस्यांचा समावेश होता.
रशियन मिसाईलने पाडले होते मलेशियन विमान?
By admin | Published: October 14, 2015 1:10 AM