क्वालालंपूर- मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रजाक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. दोन महिन्यांपुर्वी रजाक यांच्या पक्षाचा पराभव झाला. त्यानंतर देशातील सर्वात ज्येष्ठ नेते महाथिर महंमद यांच्या हाती पंतप्रधानपदाची सूत्रे आली आहेत.
नजीब रजाक यांच्यावर भ्रष्टाचार व पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हे आरोप रजाक यांनी फेटाळले असून जामिनावर सोडण्याची कोर्टाला विनंती केली आहे. मलेशियन सरकारच्या 1 एमडीबी या निधीमधून 70 कोटी अमेरिकन डॉलर्स लाटल्याचा आरोप रजाक यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांचा पराभव झाल्यानंतर नव्या सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.रजाक यांच्या अटकेसंदर्भात एक व्हीडीओ ट्वीटरवर प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप खोटे असल्याचे ते सांगत आहेत. तसेच मला माझा बचाव करण्यासाठी संधी देण्यात आली नाही असेही ते म्हणाले.त्यांच्यावरील आरोपांमुळे रजाक 20 वर्षे कारावासात जाऊ शकतात. त्यांना जामिनासाठी 10 लाख मलेशियन रिंगिट द्यावे लागणार आहेत.
मलेशियामध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत रजाक यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. त्याबद्दल बोलताना रजाक म्हणाले होते, ' जे झालं ते अत्यंत दुःखदायक आहे मात्र लोकशाहीच्या तत्वांना अनुसरुन एक पक्ष म्हणून हा निकाल स्वीकारावा लागेल'. नजीब आणि त्यांची पत्नी रोस्माह मॅन्सोर यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
नजीब यांचा पराभव 92 वर्षांचे मलेशियन नेते महाथिर मोहंमद यांनी केला. ते लोकशाही पद्धतीने निवडून येणारे जगातील सर्वात वयोवृद्ध नेते आहेत. नजीब यांनी मलेशियात 1 मलेशिया डेव्हलपमेंट बर्हार्ड (1एमडीबी ) योजनेत कोट्यवधी डॉलर्सचा भ्रष्टाचार केला असे सांगण्यात येते. महाथिर याबाबत बोलताना म्हणाले होते, ''आम्ही नजीब यांचा राजकीय सूड वगैरे घेण्याच्या विचारात नाही तर आम्ही कायद्याचे राज्य स्थापन करणार आहोत, जर नजीब यांनी काहीतरी चुकीचं केल्याचं कायद्याद्वारे सिद्ध झालं तर त्यांना परिणाम भोगावेच लागतील.'' नजीब आणि त्यांच्या पत्नीवर देश सोडण्याची मनाई केल्यानंतर नजीब यांनी ट्वीट करुन आपण सरकारच्या निर्णयाचा आदर करतो असे म्हटले आहे.